मळेवाड रुग्णालयासाठी स्वतंत्र रुग्णवाहीका

पालकमंत्र्यांनी घेतली दखल ः राजन मुळीक यांच्या मागणीला यश

*💫सावंतवाडी दि.११-:* रुग्णवाहिकांवरून जिल्ह्यात जरी राजकारण, स्टंटबाजी होत असली तरी पालकमंत्री उदय सामंत यांनी मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला खनिकर्म विभागातून रुग्णवाहिका देणार असल्याचा दिलेला शब्द पूर्ण केला. त्यामुळे कोरोना काळात आता रुग्णांची होणारी परवड थांबणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद सदस्य राजन उर्फ राजू मुळीक यांनी दिली. यावेळी महिला व बालकल्याण सभापती शर्वाणी गावकर यांनीही सदर रुग्णवाहिकेसाठी विशेष प्रयत्न केल्याचा उल्लेख श्री.मुळीक यांनी आवर्जुन केला. खनिकर्म निधीतून मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झालेल्या रुग्णवाहिकेच्या उद्घाटनानंतर राजू मुळीक बोलत होते. श्री.मुळीक म्हणाले की, कोरोना काळात रुग्णांना गोवा बांबुळी तसेच अन्यत्र अधिक उपचारासाठी हलविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे मळेवाड प्राथमिक आरोग्य केंद्राला खनिकर्म विभागाकडून अत्याधुनिक व अद्ययावत स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री उदय सामंत यांच्याकडे केली होती. खासदार विनायक राऊत, आमदार दीपक केसरकर यांनी पाठपुरावा करत सदर रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णवाहिका उद्घाटनावेळी सरपंच हेमंत मराठे, वैद्यकिय अधिकारी डॉ. अदिती ठाकूर, डॉ. अंकिता पावसकर, ग्रा.पं.सदस्या सानिका शेवडे, रुग्णकल्याण समिती सदस्य प्रकाश पार्सेकर, आरोग्य कर्मचारी मनोज सातार्डेकर, श्री.राणे आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page