अखेर ती हरली !

हर्षदाची दोन वर्षे कॅन्सर शी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी;मालवण येथील राहत्या घरी निधन

मालवण (प्रतिनिधी) गेले दीड दोन वर्ष कॅन्सर सारख्या आजाराने त्रस्त असणाऱ्या मालवण येथील हर्षदा प्रमोद तांडेल (३६) हिची कॅन्सरशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरून काल रात्री पावणे दहा वाजण्याच्या सुमारास तिचे राहत्या घरी निधन झाले. मालवण भरड येथे भाड्याने राहणाऱ्या व बेताची आर्थिक परिस्थिती असणाऱ्या तांडेल कुटुंबात हर्षदा हिच्यासह आई वडील व तीन बहिणी राहतात. चार बहिणींमध्ये मोठी असणाऱ्या हर्षदा हिला दीड वर्षापूर्वी ब्रेस्ट कॅन्सर या आजाराने ग्रासले. तिच्यावर मुंबईत कणकवलीत व कोल्हापूर या ठिकाणी उपचार करण्यात आले. या दरम्यान तिच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली तिच्या या सर्व उपचारांसाठी मोठा खर्च होत असल्याने व बेताची आर्थिक परिस्थिती असणाऱ्या तांडेल कुटुंबाला खर्च पेलवत नसल्याने अनेक सामाजिक संस्था व दानशूर व्यक्तींनी हर्षदा हिच्यासाठी मदत सुपूर्द केली होती. मातृत्व आधार फाउंडेशन तसेच या संस्थेचे संस्थापक संतोष लुडबे यांनी हर्षदा हिला आधार देत मदत केली. यासह १०० इडियट्स ग्रुप, धक्का मित्रमंडळ, भंडारी हायस्कूल माजी विद्यार्थी, विविध राजकीय पक्ष, सामाजिक संस्था यांनीही हर्षदासाठी मदतीचा हात पुढे केलाहोता. गेले काही महिने हर्षदा ही घरी राहूनच उपचार घेत होती. मात्र, अचानक प्रकृती खालावल्याने काल रात्री तिचे निधन झाले. आज सकाळी मालवण दांडी आवार येथील स्मशानभूमीत तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तरुण व उमेदीच्या वयात दुर्धर आजाराशी झुंजाणाऱ्या हर्षदा हिची झुंज अखेर अपयशी ठरून तिचे अकाली निधन झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. तिच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे. लतिका, वैभवी व योजना तांडेल यांची ती बहीण होय.

You cannot copy content of this page