बंद सीमा ओलांडून सांगलीतील दोन युवक मालवणात

बुलेट घेवून झाले दाखल नगरपालिकेने केला दोन हजार दंड वसूल करीत पाठविले परत

*💫मालवण दि.०५-:* रेडझोन असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सीमा प्रशासनाने सीलबंद केल्या असल्याने जिल्ह्यातून आत- बाहेर येण्या-जाण्यासाठी ई पास आवश्यक असतानाही सांगली येथून दोघेजण बुलेटने विनापास थेट मालवण शहरात आल्याचा प्रकार शुक्रवारी रात्री उजेडात आला असून या दोघांकडून नगरपालिकेने दोन हजार रुपये दंड करून पुन्हा माघारी पाठवले आहे नगरपालिकेच्या या कारवाई नंतरही वाहतूक पोलिसांच्या कारवाईला देखील त्यांना सामोरे जावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, सांगली येथून पहाटे ४ वाजता निघालेले हे दोन युवक आपल्या ताब्यातील बुलेटने चंदगड मार्गे संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास मालवणात पोहोचले. भरड नाक्यावर त्यांनी एकेरी मार्गाचा भंग केल्याने वाहतूक पोलिसांनी त्यांना रोखून चौकशी केली असता आम्ही सांगली येथून एका व्यक्तीला शोधण्यासाठी मालवण मध्ये आल्याचं त्यांनी सांगितलं. या दोन व्यक्ती मसाल्याचे व्यापारी असून सदरील व्यक्तीने त्यांच्याकडील ४० हजार रुपये घेऊन पोबारा केला आहे. आणि तो व्यक्ती सध्या मालवण मध्ये आल्याची माहिती मिळाल्याने आम्ही इथे आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र या दोघांकडे देखील ई पास अथवा आरटी पीसीआर टेस्टचे प्रमाणपत्र नव्हते. त्यामुळे पोलिसानी त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून नगरपालिकेला याची माहिती दिली. त्यानंतर पालिकेच्या पथकाने याठिकाणी येऊन या व्यक्तींना दंड भरून तात्काळ जिल्हा सोडण्याचे आदेश दिले. दंड न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देण्यात आला. अखेर दोन हजार रुपये दंड भरून संबंधित व्यक्तींनी तात्काळ मालवण शहर सोडले.

You cannot copy content of this page