विविध समस्यामुळे होतोय आडेली गावच्या विकासावर परिणाम….
वेंगुर्ला
वेंगुर्ला तालुक्यातील आडेली या गावातील आडेली खुटवळवाडी कार्यक्षेत्रात असलेल्या स्ट्रीटलाईटस बंदावस्थेत असल्याने नागरिकांना विविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. वेंगुर्ला मठमार्गे सावंतवाडी हा मुख्य मार्ग असूनही संबंधित विभागाचे याकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे. वारंवार बंद होणाऱ्या स्ट्रीटलाइट्स पूर्ववत सुरु करण्याकडे संबंधित प्रशासनाचे “वारंवार” दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांच्या समस्या कायम आहेत. संबंधित गावचे सरपंच यांचे याबाबतीत कोणतेही लक्ष नसल्याने स्थानिक नागरिकांतून संताप व्यक्त होत आहे. तालुक्यात बऱ्याच ठिकाणी चोरीचे प्रकार होत असल्याने ग्रामीण जनतेतून भीती व्यक्त होत आहे. आडेली गावात अन्य ठिकाणी स्ट्रीटलाईटस सुरू आहेत, परंतु या मुख्य मार्गावरील स्टीटलाईटस बंद ठेवण्याचा शासनाचा हेतू काय? असा सवाल व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान आडेली खुटवळवाडी येथे मोठा “गाजावाजा” करून बांधण्यात आलेली पाण्याची टाकी तसेच नळपाणी योजना राबविण्यात शासन अयशस्वी? ठरल्याने व पावसाळा लांबल्याने येथील स्थानिक शेतकऱ्यांना नळपाणीद्वारे पाणीपुरवठा नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाच्या कुचकामी वृत्तीचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. याबाबतीत संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष पुरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. आडेली प्राथमिक आरोग्य केंद्र नजीक मुख्य मार्गावर पडलेला भला मोठा खड्डा असूनही रात्रीच्या वेळी अपघात होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण ? असा सवाल नागरिकांतून शासनाकडे व्यक्त करण्यात आला आहे. संबंधित जिल्हा परिषद बांधकाम विभाग आडेली खुटवळवाडी प्राथमिक शाळा नजिक, आडेली प्राथमिक आरोग्य केंद्र नजीक, आडेली ग्रामपंचायत नजीक रस्ता दुतर्फा वाढलेली झाडी कटिंग न केल्याने विविध समस्या उद्भवत आहेत.
याबाबतीत स्थानिक जिल्हा परिषद सदस्य विजय नाईक यांनी” किमान ” या बाबीकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी वाहनधारकातून करण्यात आली आहे.
आडेली नजिकच्या चारही गावात स्ट्रीटलाईटस बाबतीत संबंधित ग्रामपंचायत सरपंच लक्ष पुरवून चांगले काम करीत असल्याने आडेली खुटवळवाडीतील या समस्येकडे शासनाने लक्ष पुरवावे. आडेली ग्रामपंचायत सरपंच व येथे कार्यरत असलेले ग्रामपंचायत अधिकारी यांनी सर्वं समस्याबाबत पाहणी करून नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळावी याकडे
तातडीने लक्ष पुरवावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच आडेली खुटवळवाडी भागात “स्ट्रीटलाईटस बंद अवस्थेत ठेवण्याचे प्रकार” वारंवार करण्यात येत असल्याने पंचायत समिती सदस्य नितीन मांजरेकर यांनी त्वरित याबाबत संबंधित विभागास सूचना द्याव्यात, अशी मागणीही नागरिकांतून करण्यात आली आहे.
