पालकमंत्री ना. नितेश राणे यांच्याहस्ते होणार २२ जुलै रोजी जनसेवा सप्ताहाचे उद्घाटन
सिंधुदुर्गात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन
जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांची माहिती
कणकवली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त २२ ते २८ जुलै या कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात जनसेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. या जनसेवा सप्ताहाचे उद्घाटन २२ जुलै रोजी ओरोस वैद्यकीय महाविद्यालय येथे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार असून, महायुतीतील तिन्ही पक्ष, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संयुक्त विद्यमाने हे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. नियोजित कार्यक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आठही तालुक्यांत आरोग्य, पर्यावरण आणि समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांनी दिली.
कणकवली येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हा सचिव सावळाराम अणावकर
व्हीजेएनटी जिल्हाध्यक्ष अशोक पवार, अल्पसंख्यांक महासचिव रफीक खान,
मालवण तालुका अध्यक्ष नाथा मालंडकर, कणकवली तालुकाध्यक्ष राजेंद्र पावसकर,
अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असलम खतीब, प्रांतिक सदस्य विलास गावकर,
जिल्हा उपाध्यक्ष संदीप राणे, तालुका उपाध्यक्ष सुधाकर ढेकणे, लियाकत काझी, दोडामार्ग तालुकाध्यक्ष मेघेद्र देसाई, शहराध्यक्ष इम्रान शेख, सचिन अडुळकर आदी उपस्थित होते.
पुढे श्री. नाईक म्हणाले, पक्ष स्थापनेपासून स्व. अजितदादा पवार यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला जात होता. मात्र यावर्षी त्यांच्या निधनामुळे प्रथमच जयंती कार्यक्रम आयोजित करण्याची वेळ आली असून, हा क्षण पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी अत्यंत भावनिक आहे. स्व. अजितदादा पवार यांनी दिलेल्या विचारांवर आणि जनसेवेच्या ध्येयावर चालत पक्षाची वाटचाल सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
राज्याचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार संपूर्ण राज्यातील ३५ जिल्ह्यांत २२ ते २८ जुलैदरम्यान जनसेवा सप्ताह राबविण्यात येणार आहे. त्यानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात रक्तदान शिबिरे, सर्वसाधारण आरोग्य तपासणी, महिलांसाठी मार्गदर्शन शिबिरे, कर्करोग तपासणी, वृक्षारोपण तसेच दहा हजार काजू कलमांचे वाटप करण्यात येणार आहे. युवक, महिला आघाडी, अल्पसंख्याक विभाग, ओबीसी सेल, सामाजिक न्याय विभाग तसेच इतर सर्व आघाड्यांमार्फत विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कणकवली येथे वृक्षवाटप, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिराचा जिल्हास्तरीय भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. तसेच ओरोस येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २२ ते २८ जुलै दरम्यान विविध मोफत आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. २२ ते २८ जुलैपर्यंत रक्तदान शिबिर, २२ ते २४ जुलै स्तन कर्करोग तपासणी, २५ ते २७ जुलै गर्भाशयमुख कर्करोग तपासणी, २२ ते २४ जुलै बोन मिनरल डेन्सिटी (बीएमडी) तपासणी तसेच २२ ते २५ जुलै नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या सर्व शिबिरांमध्ये तपासणी, उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा आणि स्व. अजितदादा पवार यांच्या जनसेवेच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी आयोजित कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन श्री. नाईक यांनी केले आहे.
