⚡बांदा ता.०७-: येथील पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून पंकज शिंदे यांनी आज पदभार स्वीकारला. यापूर्वी त्यांनी सावंतवाडी पोलीस ठाण्यात कार्य करताना उल्लेखनीय सेवा बजावली होती. त्यांच्या अनुभवाचा फायदा बांदा परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी होणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, बांदा पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्या रत्नागिरी बदलीनंतर त्यांनी आपला पदभार शिंदे यांच्या हाती सुपूर्द केला. पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत पदभार हस्तांतरणाची प्रक्रिया पार पडली. यावेळी उपस्थितांनी नव्या अधिकाऱ्यांचे स्वागत करत पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
पंकज शिंदे हे शांत, संयमी आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जातात. त्यांनी पूर्वीच्या कार्यकाळात विविध गुन्ह्यांच्या तपासात तसेच कायदा व सुव्यवस्था राखण्यात प्रभावी भूमिका बजावली आहे. जनतेशी सुसंवाद साधत काम करण्यावर त्यांचा नेहमी भर राहिला आहे.
नवीन पदभार स्वीकारल्यानंतर शिंदे यांनी बांदा परिसरात कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षमपणे राखण्याचा तसेच नागरिकांच्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही करण्याचा निर्धार व्यक्त केला. नागरिकांचा विश्वास संपादन करत पारदर्शक व प्रभावी कामकाज करण्याचा प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले.
फोटो:-
बांदा पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज शिंदे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
बांदा पोलीस ठाण्यात पंकज शिंदे यांचा पदभार स्वीकारला…
