दोडामार्ग-बांदा मार्गावर भीषण अपघात…

महाकाय रेड्याच्या धडकेत कारचे नुकसान, महिला गंभीर जखमी..

⚡दोडामार्ग ता.०५-: सासोली येथील तिळारी कावळ्या परिसरात दोडामार्ग-वांदा मुख्य रस्त्यावर आज सायंकाळी एक भीषण अपघात घडला. रस्त्यावर अचानक आलेल्या महाकाय रेड्याने कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या घटनेत कारमधील एक महिला गंभीर जखमी झाली असून गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोडामार्गहून कुडाळकडे जाणारी मारुती सुझुकी कंपनीची गाडी सासोली परिसरातून जात असताना अचानक एक रेडा गाडीसमोर आला. रेड्याने गाडीला जोरदार धडक दिल्याने अपघात अत्यंत भीषण झाला. धडकेमुळे गाडीच्या पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून काच आणि दरवाज्यावरही परिणाम झाला.
धडकेच्या जोरामुळे रेडा रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारात कोसळला, मात्र काही वेळाने उठून तो जंगलाच्या दिशेने पळून गेला. या अपघातात गाडीतील पुढील सीटवर बसलेल्या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमी महिलेला दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर उपचार सुरू असून तिची ओळख अद्याप समजू शकलेली नाही.
दोडामार्ग-वांदा मार्गावर वन्यप्राण्यांचा वावर वाढल्याने अशा प्रकारचे अपघात वारंवार घडत आहेत. यामुळे वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक ग्रामस्थांनी वन विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी केली आहे.

You cannot copy content of this page