अज्ञात वाहनाची धडक बसून अपघात…

अपघातात बाळकृष्ण सावंत यांचा मृत्यु..

⚡कणकवली ता.०४-: सांगवे ते कणकवली असा प्रवास करणाऱ्या दुचाकीला मागाहून येणाऱ्या अज्ञात वाहनाची धडक बसली. यात दुचाकीच्या मागे बसलेले बाळकृष्ण आत्‍माराम सावंत (वय ७५) यांचा जागीच मृत्‍यू झाला. तर दुचाकीस्वार शुभम बद्रीनाथ सावंत (वय २७) हा जखमी झाला आहे. ही घटना काल (ता.३) रात्री ८.२० च्या सुमारास कणकवली-कनेडी मार्गावरील सांगवे पामतेल फाटा येथे घडली. भिरवंडे मुरडवेवाडी येथे राहणारे शुभम आणि बाळकृष्ण सावंत हे कामानिमित्त भिरंवडे येथून कणकवलीच्या दिशेने रात्री आठच्या सुमारास दुचाकी (एमएच ०७ अेक्‍यू ०९८७) वरून निघाले होते. कणकवली-कनेडी मार्गावर सांगवे येथील उतारावर त्‍यांच्या दुचाकीला मागाहून येणाऱ्या एका वाहनाची धडक बसली. या धडकेत दुचाकीवरील शुभम याच्या मागे बसलेले बाळकृष्ण सावंत हे रस्त्यावर कोसळले. तर शुभम हा दुचाकीसह लगतच्या गटारात जाऊन पडला. या अपघातात बाळकृष्ण सावंत यांच्या डोक्याला मार लागल्‍याने त्‍यांचा जागीच मृत्‍यू झाला. तर शुभम हा जखमी झाला. कनेडी मार्गावरून येणाऱ्या वाहन चालकांच्या ही बाब लक्षात येताच जखमी शुभम आणि बाळकृष्ण सावंत या दोहोंना रूग्‍णवाहिकेतून उपजिल्‍हा रूग्‍णालयात हलविण्यात आले. यात बाळकृष्ण सावंत हे उपचारापूर्वीच मयत झाल्‍याचे डॉक्‍टरांनी सांगितले. या अपघाताची खबर दुचाकी चालक शुभम बद्रीनाथ सावंत याने आज पोलीस ठाण्यात दिली. या अपघाताचा अधिक तपास कणकवली पोलीस करत आहेत.

You cannot copy content of this page