महायुतीला १०० टक्के यश मिळणार…

दत्ता सामंत: झाराप, सुकळवाड येथे बंडखोरांवर कारवाई होणार..

⚡मालवण ता.०३-:
जिल्हापरिषद व पंचायत समिती निवडणुकीत महायुतीला १०० टक्के यश मिळणार असून खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वात महायुतीला सर्वच ठिकाणी पोषक वातावरण दिसून येत असून महायुतीचा झेंडा जिल्हापरिषद व पंचायत समितीवर पुन्हा एकदा फडकेल असा ठाम विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.

जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणूक पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे , शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, उद्योग मंत्री तथा सिंधुदुर्ग संपर्क मंत्री उदय सामंत, पालकमंत्री नितेश राणे, आमदार निलेश राणे, आमदार दीपक केसरकर यांच्या नेतृत्वात महायुतीच्या माध्यमातून एका संघपणे व एक विचारणे नियोजनबद्ध प्रचार महायुतीच्या सर्व उमेदवारांचा सुरू आहे. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात जनतेचे सरकार असून राज्यातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात महायुतीचेच अर्थात जनतेचे सरकार आहे. नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका आणि नगरपालिका निवडणुकीत महायुतीला जनतेने कौल दिला. नव्वद टक्के पेक्षा जास्त ठिकाणी महायुती विजय ठरले आहे. आता होत असलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही महायुतीची विजयी घोरदर अशीच सुरू राहणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती व जिल्हा परिषदेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे.

या निवडणुकीत विरोधकांचे कोणतेच आव्हान नसल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. उबाठा पक्षाची ही शेवटचीच निवडणुक आहे अशी स्थिती निर्माण झाली आहे. जनता विकासाचा दृष्टिकोन ठेवून महायुतीच्या पाठीशी खंबीर उभी आहे त्यामुळे महायुतीला या निवडणुकीत शंभर टक्के यश मिळणार आहे.

मालवण कुडाळ मतदार संघात अभ्यासू आणि कार्यतत्पर असे नेतृत्व आमदार निलेश राणे यांच्या रूपाने लाभले आहे. त्यांचा आवाज प्रत्येक अधिवेशनात घुमत आहे. त्यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात विकास निधी मतदार संघात येत आहे. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वात मालवण कुडाळ मतदार संघातील 15 जिल्हा परिषद व 30 पंचायत समिती जागांवर महायुतीचा झेंडा फडकेल. महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील. असा ठाम विश्वास दत्ता सामंत यांनी व्यक्त केला आहे.

अनिकेत तेंडोलकर यांचे निलंबन

कुडाळ तालुक्यातील झाराप मतदार संघात अनिकेत तेंडोलकर यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी केली आहे. त्यामुळे महायुतीचा विचार करता वरिष्ठांच्या आदेशानुसार अनिकेत तेंडोलकर यांचे शिवसेना पक्षातून सहा वर्षासाठी निलंबन करण्यात आले आहे. याबाबत मित्रपक्ष भाजपा जिल्हाध्यक्ष यांच्याशी चर्चा झाली आहे. आमचा पाठिंबा भाजप शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवारांनाच आहे. अशी माहिती दत्ता सामंत यांनी दिली.

सुकळवाड येथे संतोष गावडे भाजपा शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार

सुकळवाड पंचायत समिती येथे भाजप शिवसेना महायुतीचे संतोष गावडे हे अधिकृत उमेदवार आहेत. या ठिकाणी असलेले अपक्ष उमेदवार प्रसाद मोरजकर यांच्याशी आमचा संबंध नाही. मोरजकर यांनी वर्षभरापूर्वी उबाठातून भाजप पक्षात प्रवेश केला होता. आता त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. असे असताना प्रचारादरम्यान ते आमच्या नेत्यांची नावे घेत असतील तर ते चुकीचे आहे. प्रसाद मोरजकर यांच्याशी आमचा काहीही संबंध नाही. भाजप महायुतीचे संतोष गावडे हेच आमचे अधिकृत उमेदवार आहेत. असे दत्ता सामंत यांनी स्पष्ट केले आहे.

फोटो : दत्ता सामंत

You cannot copy content of this page