Headlines

भल्या पहाटे फ्रिजचा स्फ़ोट; कुंभारमाठ येथील बिलये कुटुंबीय हादरले…

⚡मालवण ता.३०-:
मालवण कुंभारमाठ दत्तनगर येथील गौरव बिलये यांच्या घरातील स्वयंपाक खोलीतील फ्रिजचा स्फोट झाल्याची घटना आज पहाटे ५. ३० वाजण्याच्या सुमारास घडली. पहाटे झोपेत असताना स्फोटाच्या आवाजाने बिलये कुटुंब व नजीकचे ग्रामस्थ हादरून गेले. या स्फ़ोटामुळे बिलये यांच्या घरातील विद्युत वायरिंग व इतर साहित्याचे नुकसान झाले असून सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही.

मालवण कुंभारमाठ दत्तनगर येथील गौरव बिलये यांच्या घरात त्यांची पत्नी मीना, आई सुमित्रा आणि त्यांच्या दोन्ही मुली कावेरी व मधुरा या राहतात. आज पहाटे साडे पाच वाजण्याच्या सुमारास घरातील हॉल मध्ये बिलये कुटुंबीय झोपलेले असताना अचानक घरातील स्वयंपाक खोलीत असलेल्या फ्रिजचा स्फोट झाला. स्फोटाच्या कानठिळ्या बसवणाऱ्या आवाजाने बिलये कुटुंब हादरले. स्फोटामुळे घरात धुराचे साम्राज्य पसरले होते. यावेळी बिलये कुटुंबीयांनी नजीकच्या ग्रामस्थांना पाचारण केले. त्यानंतर घरातील पाण्याच्या सहाय्याने फ्रिज मधील आग आटोक्यात आणण्यात आली.

बिलये कुटुंबीय हॉल मध्ये झोपलेले असल्याने सुदैवाने ते बचावले असून कोणालाही दुखापत झाली नाही. मात्र फ्रिजच्या स्फ़ोटामुळे स्वयंपाक खोली व घरातील विद्युत वायरिंग जळाली तसेच स्वयंपाक खोलीतील इतर काही साहित्याचे नुकसान झाले आहे.

You cannot copy content of this page