⚡सावंतवाडी ता.२९-: कोलगाव जिल्हा परिषद मतदारसंघाचे माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला होता. मात्र, उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. यातच पंचायत समितीत देखील इथे सेना-भाजप एकमेकांसमोर उभी ठाकली आहे. त्यात आता श्री. डिसोझांसह शिवसेनेच्या पंचायत समितीच्या उमेदवारान आपल्याही प्रचाराचा नारळ फोडल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोझा नारळ घेऊन अपक्ष म्हणून पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरे जात आहेत. कोलगावचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी आणि श्री देव कलेश्वर चरणी नतमस्तक होत त्यांनी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. प्रचाराचा शुभारंभ करताना श्री. डिसोझा यांच्यासह शिवसेनेच्या कोलगाव पंचायत समिती उमेदवार प्रणाली टिळवे देखील दिसून आल्या. कोलगाव पंचायत समितीसाठी महायुतीतच मैत्रीपूर्ण लढत होत आहे. दोन्ही पक्षांनी एबी फॉर्म कायम ठेवल्याने युतीला तडा गेला. याठिकाणी शिवसेनेच्या सौ. टिळवेंसमोर भाजपच्या संध्या हळदणकर उभ्या आहेत. सेना भाजपातच इथे थेट लढत होत आहे. तर जिल्हा परिषद मतदारसंघातून भाजपच्या अधिकृत उमेदवार महेश सारंग यांच्या विरोधात भाजपातून बंडखोरी करणारे श्री. डिसोझा लढत आहेत. यात अपक्ष मायकल डिसोझा यांच्यासह प्रचार शुभारंभावेळी शिवसेना उमेदवार सौ. टिळवे व शिवसैनिक दिसून आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे. त्यामुळे कोलगाव जिल्हा परिषद व पंचायत समिती मतदारसंघात भाजप विरुद्ध अपक्ष व शिवसेना असं समीकरण बनलं असून ही युती चर्चचा विषय बनली आहे.
