मालवणी वक्तृत्व स्पर्धेत सायली खोत आणि नितीन गोलतकर प्रथम…

आकार स्टुडिओ चे आयोजन:मुंबईसह जिल्हाभरातून ५० स्पर्धक सहभागी..

कुडाळ : कुडाळ मध्ये झालेल्या आकार स्टुडिओ आयोजित मालवणी वक्तृत्व स्पर्धेत खुल्या गटात नितीन गोलतकर यांनी तर सायली खोत हिने महाविद्यलयीन गटात विजेतेपद पटकावले. या स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त आणि उत्तम प्रतिसाद मिळाला. स्पर्धेत मुंबईसह जिल्हाभरातून मोठ्या गटातून २७ तर लहान गटातून २३ असे एकूण ५० स्पर्धक सहभागी झाले होते.
कुडाळ हायस्कुलच्या चिं त्र्यं खानोलकर ललित कला केंद्र येथे झालेल्या या वक्तृत्व स्पर्धेचे उदघाटन मालवणी भाषेचे अभ्यासक डॉ. बाळकृष्ण लळीत आणि उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून झाले. यावेळी व्यासपीठावर पत्रकार शेखर सामंत, मालवणी कवी दादा मडकईकर, रंगकर्मी केदार सामंत, रोटरी क्लब कुडाळचे अध्यक्ष डॉ संजय केसरे, परीक्षक आनंद वैद्य, डॉ. सई लळीत, प्रा. संतोष वालावलकर, बादल चौधरी, आकार स्टुडिओचे गजानन
कांदळगावकर आदी मान्यवर उपस्थित होते. आकार स्टुडिओचे गजानन कांदळगावकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून स्पर्धेमागचा उद्देश स्पष्ट केला.
मालवणी म्हणून जर आपली मालवणी भाषा टिकली पाहिजे तर मालवणी भाषेचे संगोपन चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे. या मालवणी स्पर्धेच्या माध्यमातून आकार स्टुडिओने ते काम हाती घेतले आहे याचा आनंद आहे. असे डॉ. बाळकृष्ण लळीत यांनी यावेळी सांगितले. या अनोख्या अशा स्पर्धेचे पत्रकार शेखर सामंत यांनी देखील आपल्या मनोगतातून कौतुक करून स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. यावेळी केदार सामंत, डॉ. संजय केसरे, यांनी देखील स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
त्यांनतर महाविद्यालयीन आणि खुल्या गटाची स्पर्धा एकाच वेळी सुरु झाली. महाविद्यालयीन गटासाठी ‘कोकणच्या विकासाचा इमान उडताहा’, ‘आपली भाषा… लाजाक व्हया कीत्या ?’आणि ‘स्त्री पुरुष समानता ?- वास्तव’ हे विषय देण्यात आले होते. तर खुल्या गटासाठी ‘उद्याचो कोकण’, ‘मी परंपरा नाकारतंय कि स्विकारतंय’ आणि ‘ट्रोलिंग एक नवीन दुखणा’ असे विषय होते. महाविद्यालयीन गटातून २३ तर खुल्या गटातून २७ स्पर्धकांनी आपले विचार मांडले.
सकाळी साडेदहा वाजता सुरु झालेली स्पर्धा सायंकाळी साडेतीन वाजता संपली. त्यांनतर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. महाविद्यालयीन गटातून पहिला क्रमांक सायली भगवान खोत, रोख रुपये ५००१ , सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, दुसरा क्रमांक श्रद्धा सत्यवान मडव, रोख रुपये ३००१ ,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तिसरा क्रमांक उज्वल गुरुनाथ तोंडवळकर रोख रुपये २००१,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तेजनार्थ प्रथम सुचिता लक्ष्मण मांजरेकर रोख रुपये १००१ व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ द्वितीय वैभवी सतीश परब रोख रुपये ५०१ आणि प्रमाणपत्र. यावेळी स्पर्धेत उत्तम वक्तृत्व केल्याबद्दल परीक्षकांच्या मतानुसार सिद्धी बळीराम परब हिचा गजानन कांदळगावकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
खुला गट निकाल : प्रथम क्रमांक नितीन गोलतकर रोख रुपये ७००१,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, दुसरा क्रमांक तृप्ती प्रभुदेसाई रोख रुपये ५००१, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, तिसरा क्रमांक सहदेव धरणे रोख रुपये ३००१, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र, उत्तजनार्थ प्रथम नम्रता कविटकर रोख रुपये १००१ व प्रमाणपत्र आणि उत्तेजनार्थ द्वितीय सिद्धी वरवडेकर रोख रुपये ५०१ व प्रमाणपत्र. या सर्व सर्वस्पर्धकांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी परीक्षक आनंद वैद्य, प्रा. संतोष वालावलकर तसेच प्रमुख अतिथी दादा मडकईकर यांनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले.
बक्षीस वितरण मालवणी कवी दादा मडकईकर, आनंद वैद्य, डॉ. सई लळीत, अनंत जामसंडेकर, प्रा. . संतोष वालावलकर, बादल चौधरी, डॉ. प्रणव प्रभू, समीरा प्रभू, बंड्या जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. सर्वांचे स्वागत गजानन कांदळगावकर आणि आकार स्टुडिओच्या टीमने केले. सर्व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बादल चौधरी यांनी केले. यावेळी आकार स्टुडिओचे अजिंक्य जामसंडेकर, डॉ. प्रणव प्रभू, समीरा प्रभू, अनिल पाटकर उपस्थित होते. या स्पर्धेला मुंबईसह संपूर्ण जिल्ह्यातून फार चांगला प्रतिसाद लाभला.

You cannot copy content of this page