⚡मालवण ता.२५-: भारतीय बीच टेनिस संघटनेच्या मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्र बीच टेनिस असोसिशन व सिंधुदुर्ग बीच टेनिस संघटना यांच्या वतीने देवबाग येथील किनाऱ्यावर ६ वी राष्ट्रीय बीच टेनिस स्पर्धा (मुले – मुली) संपन्न झाली. या स्पर्धेत देशातील विविध राज्यांच्या संघांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत तामिळनाडू संघाने विजेतेपद पटकाविले. तर महाराष्ट्र संघाला दुसऱ्या व छत्तीसगड संघाना तिसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. विजेत्या प्रथम तीन संघांमधील सुवर्ण पदक मिळविलेल्या खेळाडूंची सिंगापूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
या स्पर्धेचे उदघाटन देवबाग हायस्कुलच्या मुख्याध्यापिका सौ. रचना रुपेश खोबरेकर यांच्या हस्ते झाले. उदघाटन कार्यक्रम प्रसंगी भारतीय बीच टेनिस संघटनेचे सल्लगार पी. एस. गिल, महाराष्ट्र बीच टेनिसचे महासचिव सुभाष उरकुडे देवबागचे सरपंच उल्हास तांडेल, उपसरपंच श्री. बिलये यांसह ग्रामस्थ उपस्थित होते. या स्पर्धेत महाराष्ट्र, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, तेलंगणा, तामिळनाडू, पॉंडीचेरी, उत्तरप्रदेश, गोवा, कर्नाटक, ओडिसा, चंदीगड आदी संघांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी सिंधुदुर्ग बीच टेनिस संघटनेचे सचिव विजय केळूसकर, मोहन कुबल, शशांक कुमठेकर, विलास बिलये यांनी मेहनत घेतली.
