९ लाख १४ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त: कोल्हापूर भरारी पथकाची कारवाई..
⚡बांदा ता.२८-: राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या कोल्हापूर भरारी पथकाने आकेरी (ता. सावंतवाडी) येथे मोटारीतून होणाऱ्या अवैध दारू वाहतुकीवर कारवाई करत ९ लाख १४ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी चालक प्रकाश कुंजन नायर (वय ४२, रा. आकेरी-तावडेवाडी, ता. कुडाळ) याला ताब्यात घेण्यात आले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क खात्याचे कोल्हापूर विभाग भरारी पथक मुंबई गोवा महामार्गावार आकेरी येथे गस्तीवर होते. गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या मोटारीला (एमएच ०६ एएन १७०३) तपासणीसाठी थांबविण्यात आले. मोटारीची तपासणी केली असता आतमध्ये गोवा बनवटीच्या दारूचा अवैध साठा आढळला. पथकाने ७५० मिली व १८० मिली मापाच्या एकूण ८८८ सिलबंद प्लास्टिक व काचेच्या बाटल्या असे एकूण ६२ बेकायदा खोके जप्त केलेत. तसेच चालकाला ताब्यात घेतले. ३ लाख ७४ हजार ८८० रुपये किमतीची दारू, ५ लाख ४० हजार रुपये किमतीची मोटार असा एकूण ९ लाख १४ हजार ८८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
ही कारवाई भरारी पथकाचे दुय्यम निरीक्षक एस एस गोंदकर, वाय एन फटांगरे, सुशांत बनसोडे, अमोल यादव, विलास पवार, योगेश शेलार यांच्या पथकाने केली. अधिक तपास दुय्यम निरीक्षक फटांगरे करीत आहे.
