मंदार हाडके:पर्यटन व्यावसायिकांची कार्यशाळा संपन्न..
⚡मालवण ता.२८-: सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून केंद्रीय पर्यटन मंत्रालयाच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यात सिंधुदुर्ग हा एकमेव जिल्हा केंद्रीय स्वदेश दर्शन पर्यटन योजनेत समाविष्ट करण्यात आला आहे. स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन वाढीसाठी प्रशासन प्रयत्नशील असे प्रतिपादन पर्यटन मंत्रालयाचे प्रकल्प समन्वयक मंदार हाडके यांनी मालवण येथे बोलताना केले.
जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील हॉटेल, होम स्टे, ऍग्रो टुरिझम, रीसॉर्ट क्षेत्रातील पर्यटन व्यावसायिकांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी निधी पोर्टल रजिस्टर माहितीसाठी मालवण येथील मामा वरेरकर नाट्यगृह येथे पर्यटन व्यावसायिकांची कार्यशाळा गुरुवारी संपन्न झाली. यामध्ये मंदार हाडके हे मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे मालवण शहर अध्यक्ष मंगेश जावकर यांच्या हस्ते मंदार हाडके यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी मंदार हाडके म्हणाले, स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी कार्य होणार असून स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमध्ये समन्वय साधून कार्य केले जाणार आहे, असे ते म्हणाले. तसेच यावेळी निधी पोर्टलवर पर्यटन व्यवसायिकांनी कशा पद्धतीने नोंदणी करावी, याचे त्यांनी मार्गदर्शन केले. न्याहरी निवास सर्वेक्षण तसेच कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण कार्यक्रम जिल्ह्यातील तालूका स्तरावरील गावा गावात राबविण्यात येणार असल्याचेही श्री. हाडके यांनी सांगितले.
यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघ अध्यक्ष व स्वदेश दर्शन समिती सदस्य विष्णू मोंडकर म्हणाले, जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय स्थानिकांनी कुठल्याही शासकीय मदतीशिवाय स्वकर्तृत्वावर उभा केला असून या भागात आज जिल्ह्यात पर्यटन व्यवसाय बहरत आहे. जिल्ह्यातील शाश्वत पर्यटन विकासासाठी स्वदेश दर्शन योजनेच्या माध्यमातून सागरी पर्यटना बरोबर कृषी, मेडिकल, हिस्ट्री जंगल टुरिझम क्षेत्रात काम होणार असून स्थानिक पर्यटन व्यावसायिक आणि प्रशासन यामध्ये समन्वय साधने पर्यटन स्थळांवर आवश्यक सुविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे.
यावेळी पर्यटन व्यावसायिक महासंघ सल्लागार गुरु राणे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी मिलिंद झाड, किशोर दाभोलकर, प्रफुल मांजरेकर, सुनील देसाई, दादा वेंगुर्लेकर आदी वं इतर पर्यटन व्यावसायिक उपस्थित होते.
