विठू महाकाली देवीच्या पालखीचे सोनाळी येथे राजेशाही थाटात स्वागत…

वैभववाडी प्रतिनिधी
     वैभववाडी तालुक्यातील रावराणे ईनामदार समाजाचे आराध्य दैवत मिळंद ता.राजापूर जिल्हा रत्नागिरी येथील श्री विठू महाकाली देवीच्या  पालखीचे मंगळवारी वैभववाडी तालुक्यातील सोनाळी येथे आगमन झाले. याठिकाणी सोनाळी ग्रामस्थ व वैभववाडी तालुक्यातील रावराणे समाजाच्यावतीने भव्य दिव्य राजेशाही थाटात स्वागत करण्यात आले. सोनाळी येथील श्री पावणादेवी व श्री विठू महाकाली देवीच्या पालखीची भेट झाली. हा पालखी सोहळा पहाण्यासाठी तालुक्यातील सर्व जाती धर्माच्या लोकांनी गर्दी केली होती. पालखी सोहळ्यानिमित्त तालुक्यातील रावराणे समाजातील चाकरमानी व माहेरवाशींनी गावागावात दाखल झाले असून तालुक्यात उत्साही, आनंदी, भक्तीमय वातावरण झाले आहे. गावागागावात पालखीच्या स्वागतासाठी विदयुत रोषणाई, रांगोळी, गुड्या उभारुन देवीचे स्वागत करण्यात येत आहे. पुढचे पाच दिवस पालखीचा मुक्काम वैभववाडी तालुक्यात असणार आहे.
       यावर्षी तब्बल बारा वर्षांनी देवीची पालखी वैभववाडी तालुक्यात आली आहे. विठु महाकाली देवीच्या पालखी सोहळ्याची परंपरा ही सुमारे २०० वर्षापासून आहे.  वैभववाडी तालुक्यातील रावराणे समाजाच्या बारा इनाम गावात पालखीचे आगमन होणार आहे.
     गेले काही दिवस आतुरतेने वाट पहात असलेल्या  प्रथा परंपरेप्रमाणे मिळंद येथुन मंगळवारी सकाळी १०.३० वा. पालखीचे लवाजम्यसह  सोनाळी येथे ढोल ताशाच्या गजरात आगमन झाले. सोनाळी गावचे ग्रामदैवत श्री पावणादेवी व श्री विठू महाकाली देवीच्या पालखीची भक्तीमय वातावरणात भेट झाली.हा सोहळा पहाण्यासाठी सोनाळी ग्रामस्थ, संपूर्ण तालुक्यातील रावराणे समाजाने हजारोंच्या संख्येने गर्दी केली होती. सोनाळी येथील धार्मिक कार्यक्रम आटपून पालखीने एडगावकडे प्रस्थान केले. एडगाव  फौजदारवाडी व इनामदारवाडी येथेही आकर्षक रांगोळ्या, पताका व गुड्या उभारुन पालखीचे भक्तीभावाने स्वागत करण्यात आले. तर एडगाव  होळीच्या मांडावर श्री रामेश्वर पालखी व विठू महाकाली देवीच्या पालखीची भेट झाली. त्यानंतर रामेश्वरवाडी येथे महाप्रसाद झाला. दुपारनंतर तिथून एडगांव वांयबोशी येथून जुन्या पायवाटेने  पालखी सांगुळवाडी महापूरुष येथे पोहचली . तर सांगुळवाडी होळीच्या मांडावर भगवती देवी व विठू महाकाली देवीच्या पालखीच्या भेटीचा सोहळा पार पडला. त्यानंतर रावराणे समाजाचे श्रध्दास्थान जगदोजी रावराणे किर्ती मंदिर येथे देवीच्या पालखीने भेट दिली. सायंकाळी पालखी नावळे येथील थोरले घराकडे प्रस्थान केले. त्याठिकाणी भव्य स्वागत करण्यात आले. तर याठिकाणी ओटी भरणे, राञीचा महाप्रसाद व राञीचा मुक्काम असा कार्यक्रम होणार आहे.
      तर दिनांक २७ मार्च रोजी  सांगुळवाडी व निमअरुळे बोर्चादेवी होळीचा मांड येथे देवीची पालखी भेट देणार आहे.तर सांगुळवाडी येथे राञीचा मुक्काम होणार आहे . तर दिनांक २८ मार्च रोजी एडगांव येथे रुढी परंपरे प्रमाणे रावराणे समाजाच्या भैरी भवानी मंदिरास भेट देऊन एडगांव येथे मुक्काम होणार आहे.
    त्याचप्रमाणे दिनांक २९ रोजी सोनाळी होळीचा मांड व पूर्व परंपरे प्रमाणे भेट देणार आहे.   त्यानंतर यावर्षी पासून प्रथमच अरुळे, सडुरे,लारे, आचिर्णे या गावांतुन पालखीचे आगमन होणार असून आचिर्णे येथे मुक्काम होणार असून दिनांक ३० मार्च रोजी वाभवे होळीचा मांड येथे भेट देऊन पालखीचे मिळंदकडे प्रस्थान होईल.

फोटो-
सोनाळी येथे विठू महाकाली व पावणादेवी पालखीच्या भेटीचा सोहळा.छाया संजय शेळके वैभववाडी
     
   

You cannot copy content of this page