कुडाळमध्ये बुधवारी‘युवा महाराष्ट्रभिमान मेळावा…

⚡कुडाळ ता.२५-: युवासेना, युवक काँग्रेस, युवक राष्ट्रवादी व शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) युवा संघटनेच्या माध्यमातून बुधवार, २७ मार्च रोजी सकाळी ११.३० वाजता कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे ‘युवा महाराष्ट्रभिमान मेळावा’ आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला युवासेना नेते तथा युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तसेच संपर्कप्रमुख अरूण दुधवडकर, माजी खा. विनायक राऊत, आ. राजन साळवी, आ. वैभव नाईक यांची प्रमुख उपस्थिती राहणार असल्याची माहिती युवासेनेचे युवासेना कोकण सचिव तथा युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट यांनी दिली.


कुडाळ येथील शिवसेना शाखा येथे सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंदार शिरसाट बोलत होते. यावेळी युवा जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, कुडाळ युवासेना अध्यक्ष योगेश धुरी, संदीप म्हाडेश्वर आदि उपस्थित होते.
यावेळी मंदार शिरसाट यांनी सांगितले की, या मेळाव्याला काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी तसेचआपचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. जवळपास दीड-दोन हजार युवक, कार्यकर्ते या मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचे नियोजन आहे. लोकसभा निवडणुकच्या पार्श्वभूमीवर आमची युवक संघटना आमच्या उमेदवाराला अधिकाधिक मताधिक्य मिळवून देण्यासाठी कशाप्रकारे नियोजन होईल? याबाबतचे मार्गदर्शन या मेळाव्यात करण्यात येणार आहे. युवकांचा मतदानाचा टक्का वाढला असून तो टक्का आमच्याकडे कसा येईल? त्या दृष्टीचे आमचे प्रयत्न राहणार असल्याचे मंदार शिरसाट यांनी सांगितले.
यावेळी सुशांत नाईक म्हणाले की, हा युवक मेळावा काँग्रेस,शिवसेना, राष्ट्रवादी व आपच्या माध्यमातुन होत आहे. संपुर्ण महाराष्ट्रात वरून सरदेसाई प्रत्येक मतदार संघात दौरा करत आहेत. त्याच पार्श्वभुमीवर या मतदार संघात युवासेनेचा हा युवा महाराष्ट्र अभिमान युवा मेळावा संपन्न होत आहे. या मेळाव्यासाठी युवासेनेकडुन संपुर्णतः तयारी झाली आहे. प्रदेशने आमच्यावर विश्वास टाकुन या मेळाव्याची जबाबदारी दिली आहे. त्यामुळे हा मेळावा यशस्वी करण्यासाठी आमचे प्रामाणिक प्रयत्न राहणार आहेत. हा मेळावा जिल्ह्यातील युवकांना निश्चितच दिशा देणारा असेल असा विश्वास यावेळी श्री. नाईक यांनी व्यक्त केला आहे.

You cannot copy content of this page