स्थिर सर्वेक्षण पथकाची कारवाई..
⚡कणकवली ता.१९-: लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर फोंडाघाट चेक पोस्ट येथे स्थिर सर्वेक्षण पथकाला (एसएसटी) वाहन तपासणी दरम्यान एका कारमध्ये दहा लाख रुपयांची रोख रक्कम मिळून आली. याप्रकरणी पथकाने रोख रक्कमेसह ती कार जप्त केली आहे. ही कारवाई सकाळी ११वा.च्या सुमारास करण्यात आली. या घटनेमुळे कणकवली तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार वाहन तपासणी वेळी कोल्हापूरवरून गोव्याच्या दिशेने जात असणाऱ्या एका चारचाकीमध्ये १० लाखाची रक्कम आढळून आली. यावेळी एसएसटी विभागाचे अधिकारी विश्वास राणे, श्री. बाणे, कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी, पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस हवालदार मंगेश बावदाने, पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने, पोलीस कॉन्स्टेबल किरण मेथी हे उपस्थित होते. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील ही पहिलीच मोठी कारवाई मानली जात आहे. पोलीस व स्थिर सर्वेक्षण पथकाने ही रक्कम ताब्यात घेतली. मात्र, ही एवढी मोठी रक्कम सिंधुदुर्गात का आणण्यात आली ? कोणी आणली ? कुठे घेऊन जाण्यात येत होती ? याची कसून तपासणी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
