खारेपाटण चेकपोस्टवर गोवा बनावटी दारूला अडकाव…

आयशर टेम्पोसह तब्बल ६३ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त..

⚡कणकवली ता.१८-: खारेपाटण चेकपोस्टवर गोवा बनावटीच्या अवैध दारूने भरलेल्या आयशर टेम्पोसह तब्बल ६३ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल कणकवली पोलीस, एस.एस.टी पथक आणि एक्साईज कणकवलीच्या पथकाने पकडला आहे. या गुन्ह्यात टेम्पो चालक मालक दिनेश रमेश व्यास (३९, रा. अहमदाबाद गुजरात, सध्या रा. वसई) याला अटक करण्यात आली आहे. खारेपाटण दुरक्षेत्राचे पोलीस नाईक उद्धव साबळे यांच्या सतर्कतेमुळे ही अवैध दारू पकडण्यात यश आले आहे.


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कृषिकेश रावले, कणकवली पोलीस निरीक्षक समशेर तडवी यांच्या सूचनेनुसार पोलीस यंत्रणा अधिक अलर्ट झाली आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सद्या देशात सर्वत्र आचारसंहिता जाहीर झालेली असतानाच मुंबई – गोवा राष्ट्रीय महार्गावर खारेपाटण पोलीस चेकपोस्ट येथे सोमवार १८ मार्च रोजी सकाळी६.३० वाजता गोव्याहून मुंबई च्या दिशेने जाणाऱ्या आयशर टेम्पोची पोलीस नाईक उद्धव साबळे यांनी तपासणी केली. टेम्पोच्या हौद्यात दारुसाठा आढळताच साबळे यांनी वरिष्ठांना याबाबत कळविले. चेकपोस्टवरील एसएसटी टीम मधील आर एल शिंदे, बापू कुचेकर यांनी एक्साईज कणकवली निरीक्षक नितीन शिंदे यांना कळविले. त्यांनतर कणकवली पोलीस तसेच एक्साईज च्या पथकाने संयुक्त कारवाई करत तब्बल २८ लाख ८८ हजार ४०० रुपयांच्या अवैध दारुसह ३५ लाख रुपये किंमतीचा आयशर टेम्पो असा एकूण ६३ लाख ८८ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही संयुक्त कारवाई पोलीस उपनिरीक्षक शरद देठे, पोलीस नाईक उद्धव साबळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण मोहिते, एस एस टी प्रमुख आर एल शिंदे, बापू कुचेकर, एक्साईज कणकवली निरीक्षक नितीन शिंदे, महिला पोलीस जवान एस एस कुवेस्कर यांच्या पथकाने केली. अधिक तपास एक्साईज कणकवलीचे निरीक्षक नितीन शिंदे करत आहेत.

You cannot copy content of this page