⚡सावंतवाडी ता.१९-: १६ रोजी फादर रिचर्ड सालदान्हा यांच्या अभिनव संकल्पनेतून मिलाग्रिस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज सावंतवाडी च्या पटांगणावर “प्रायमरी ए ॲन्युअल फंक्शन कम ग्रॅज्युएशन डे”हा कार्यक्रम संपन्न झाला.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या सौ.अर्चना घारे( सावंतवाडी विधानसभा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी),रेव्ह.फादर ॲन्ड्रु डिमेलो, रेव्ह.फादर मिलेट डिसोझा ( मॅनेजर), फादर फिलिप, प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा, उपमुख्याध्यापिका सिस्टर मेबल कार्व्हालो, पर्यवेक्षिका सौ.मेघना राऊळ ,मराठी प्राथमिक च्या मुख्याध्यापिका सिस्टर कविता चांदी उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाचे औचित्य साधून वर्षभरामध्ये खेळ,शिक्षण व इतर क्षेत्रात प्राविण्य मिळवणाऱ्या प्रशालेच्या च्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
आपण ज्या शाळेत शिकलो आणि ज्या शाळेने आपल्याला मोठं केलं त्याच शाळेच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने व्यासपीठावरुन विद्यार्थ्यांना बक्षिस देताना आपल्याला फार आनंद होत आहे अशा भावना प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी आणि कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या सौ.अर्चना घारे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केल्या.
मिलाग्रीस स्कूल व ज्युनियर कॉलेज ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रतिथयश शाळा असून विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे उपक्रम नेहमीच राबवित असते. प्रत्येक विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता सारखी नसते तसेच प्रत्येकामध्ये वेगवेगळ्या कला, निरनिराळे कौशल्य लपलेले असते. ते शोधून काढण्यासाठी सर्व कौशल्यांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धा, उपक्रम राबवले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांमधील कलेचे चीज व्हावे.
आजच्या या स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य हेच आहे की, प्रत्येक विद्यार्थ्यांला प्लॅटफॉर्म मिळावा यासाठी प्रत्येकाला यात सहभागी करून घेतले आहे.असे प्रतिपादन प्रशालेचे मुख्याध्यापक रेव्हरंड फा. रिचर्ड सालदान्हा यांनी केले.
कलर्स ऑफ लाईफ या थीम च्या अंतर्गत विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार प्रेक्षकांना पाहायला मिळाला.या कार्यक्रमासाठी हजारोंच्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी केले ही या कार्यक्रमाची विशेष बाब होती.तर आभार प्रशालेच्या शिक्षिका सौ. क्लीटा परेरा यांनी व्यक्त केले.अशा प्रकारे हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
