अजयकुमार सर्वगोड :माजी आम.उपरकर यांनी तक्रारी करण्यापेक्षा विकासात मार्गदर्शन करावे
⚡कणकवली ता.१७-: माजी आम. परशुराम उपरकर यांनी केलेल्या प्रत्येक आरोपाच्या चौकशीला सामोरे जाण्यास मी तयार आहे. शासनाचा एकही रुपयाही वाया न जाण्यासाठी आम्ही काम करत आहोत.परशुराम उपरकर यांनी जिल्ह्याच्या विकासात्मक काम करावे ,मात्र ते माहितीचा अधिकार टाकून आमच्यासारख्या अधिकाऱ्यावर दबाव आणत आहेत. त्यापेक्षा उपरकर यांनी आम्हाला जिल्ह्याच्या एखाद्या विकासातील कामासंदर्भात सहकार्य करावे. जेथे कुठे चुकत असेल त्यावेळी चूक दाखवून द्यावी. अशी प्रतिक्रिया कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड यांनी दिली.
अजयकुमार सर्वगोड पत्रकारांशी बोलताना म्हणाले,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन चांगली कामे करण्याचा प्रयत्न आहे. मात्र गेल्या वर्षभरात माजी आम.परशुराम उपरकर ते केलेल्या कामांवर केवळ माहीतीच्या अधिकारात अर्ज करतात . विनाकारण आमची हॅरेस्टमेंट करत आहेत. कारण राष्ट्रहितासाठी आम्ही काम करतो. आम्ही कुठल्याही एजन्सीच्या चौकशीला तयार आहोत , असे अजयकुमार सर्वगोड यांनी सांगितले.
ते म्हणाले,माझ्या माहितीनुसार दहा लाखाच्या वरील सर्व कामे ई-टेंडरने केली जातात. ई टेंडर हे पारदर्शक आहे, यामध्ये कार्यकारी अभियंत्याला डायरेक्ट कोणालाही टेंडर देण्याचे अधिकार नाही आहेत. जी काही निविदा प्रक्रिया राबवली गेली आहे त्यामध्ये दहा लाख ते एक कोटीचे अधिकार कार्यकारी अभियंत्याला आहेत. एक कोटी ते अडीच कोटीचे अधिकार अधीक्षक अभियंताला आहेत. अडीच कोटी ते त्याच्यावरील सर्व कामांचे अधिकार मुख्य अधीक्षकांकडे आहेत. ई टेंडरमध्ये काहीही मॅनेज करण्याची सुविधा नाही. हि पारदर्शक कार्यप्रणाली आहे. त्यामुळे अशा प्रकारचे आरोप आहेत ते बिनबुडाचे आरोप असल्याचे असे श्री. सर्वगोड यांनी सांगितले.
परशुराम उपरकर हे हुशार माजी आमदार आहेत. यात कोणताही संदेह नाही. उपरकर हे गेले वर्षभर शासनाच्या झालेल्या कामांच्या बाबतीत माहितीच्या अधिकारात माहिती विचारत आहेत. ते कोणतेही विकासात्मक काम करा, किंवा कोणत्याही कामाबाबत हे काम का पूर्ण होत नाही. त्यासाठी कधीही फोन करत नाहीत. तसेच राज्य शासनाकडून एखादे काम मंजूर करून आणताना दिसत नाहीत. असे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड म्हणाले.
