सुरेश ठाकूर:मालवण येथे ग्रंथपाल ग्रंथालय गौरव सोहळा संपन्न…
⚡मालवण ता.१७-: “ग्रंथालये ही सांस्कृतिक विद्यापीठे आहेत, तर ग्रंथपाल हे ग्रंथ आणि वाचक यांच्यामधील महत्त्वाचा दुवा आहेत. त्यांच्यामुळेच दर्जेदार ग्रंथ चोखंदळ वाचकांच्या हाती जातात,” असे प्रतिपादन कोमसाप मालवणचे अध्यक्ष सुरेश ठाकूर यांनी कोकण मराठी साहित्य परिषद शाखा मालवण आणि नगर वाचनालय मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘ग्रंथपाल ग्रंथालय गौरव’ सोहळ्यात केले.
दोन्ही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नगर वाचनालय मालवणच्या सभागृहात हा कार्यक्रम साजरा झाला. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कोमसापचे केंद्रीय सदस्य रुजारिओ पिंटो, सदानंद कांबळी, डॉ. सुभाष दिघे, प्रविण पारकर आदी उपस्थित होते. याचवेळी मालवण तालुक्यातील वीस ग्रंथालयांना कोकण मराठी साहित्य परिषद मालवणने संपादित केलेली बीज अंकुरे अंकुरे (ललित) आणि ये ग ये ग सरी (कविता संग्रह) ही प्रत्येकी दोन पुस्तके सर्व वाचनालयांना देण्याचा शुभारंभ करण्यात आला.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याचे औचित्य साधून सर्व ग्रंथपालांच्या वतीने संजय शिंदे ग्रंथपाल नगरवाचनालय मालवण यांचा रुजारिओ पिंटो यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तर ग्रंथपाल लेखिका म्हणून श्रीम. ऋतुजा केळकर, ग्रंथपाल साने गुरुजी वाचन मंदिर मालवण यांचा सुभाष दिघे यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
