आमदार केसरकरांच्या घोषणा म्हणजे निवडणूक प्रचाराची नांदी…

उपतालुकाप्रमुख राजू शेटकर : मंत्री दीपक केसरकर अकार्यक्षम आमदार..

⚡बांदा ता.१८-: मागील पंधरा वर्षे सत्ताधारी पक्षात आणि त्यातही तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील असूनही मतदारसंघात कामे करता आली नाही. अजून पाच वर्षे आमदारकी मागून शिक्षण मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आपली अकार्यक्षमता सिद्ध केली आहे. सातार्डा उत्तम स्टीलच्या ठिकाणी मोठा प्रकल्प आणण्याची घोषणा म्हणजे होऊ घातलेल्या निवडणुकांच्या प्रचाराची नांदी समजावी, कारण निवडणुकांच्या तोंडावर अशी आश्वासने देण्याची केसरकर यांना सवयच असल्याचा टोला, शिवसेना (ठाकरे गट) सावंतवाडी उपतालुकाप्रमुख राजू शेटकर यांनी प्रसिद्धी पत्रकातून लगावला.


श्री. शेटकर म्हणाले की, मागील काही निवडणुकांपूर्वी सेट अप बॉक्स कंपनी, चष्मे कंपनी, आंबोली येथे गोल्फ पार्क अशी आश्वासने आमदार दीपक केसरकर यांनी दिली जी आजतागायत पूर्ण नव्हे तर कामाला सुद्धा सुरुवात झाली नाही. त्यात अजून एका आश्वासनाची भर पडली. पाऊस पडल्यावर बेडकांची डराव डराव आणि निवडणुका आल्यावर आमदार केसरकर यांची आश्वासने दोन्ही गोष्टी जनतेच्या सवयीच्या झाल्या असल्याचे शेटकर म्हणाले.
गतकाळात पालकमंत्री, अर्थ व गृहमंत्री, केबिनेट मंत्री त्यातही तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या खास मर्जीतील असूनही मतदारसंघात अपेक्षित कामे करता आली नाही. त्यामुळे अजून पाच वर्षे आमदारकी मागून त्यांनी आपली अकार्यक्षमता सिद्ध केली आहे. त्यांच्या पंधरा वर्षे आमदारकीच्या कार्यकाळाचा अभ्यास केल्यास ते विसरत आहेत की सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्यात सावंतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला असे तीन तालुके येतात. त्यांच्या हट्टापायी सावंतवाडीसाठी मंजूर असलेले मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल अजूनही लटकून पडलेले आहे. वेत्ये येथे विना मोबदला जागा उपलब्ध असताना सावंतवाडी शहरातील विकतच्या जमिनीसाठी केसकर यांचा आग्रह का? त्यांच्या मतदारसंघातील दोडामार्ग रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी वेळेत मिळत नाही हे त्यांना माहिती नाही काय? आश्वासने देण्यापेक्षा या मूलभूत गरजांची पूर्तता केली असती तर आज उमेदवारीसाठी झुंजावे लागले नसते असा टोला राजू शेटकर यांनी लगावला.
मतदार केसरकरांच्या नाकर्तेपणाला कंटाळलेला आहे. आमदार केसरकर यांना उमेदवारी मिळाल्यास मतदार यंदाच्या निवडणुकीत मात्र त्यांना निरोप दिल्याशिवाय राहणार नसल्याचे राजू शेटकर यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले.

You cannot copy content of this page