पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या येण्याने मालवणचे नाव जगाच्या पटलावर जाईल…

आम. श्रीकांत भारतीय:मोरयाचा धोंडा स्थळाचा पर्यटन दृष्ट्या विकास बाबत केली चर्चा..

⚡मालवण ता.१७-:मालवणात सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजऱ्या होणाऱ्या नौदल दिन कार्यक्रमाची भारता बरोबरच संपूर्ण जगाला उत्सुकता लागून राहिली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभे करण्याची जी परंपरा विकसित केली, त्याला वंदन करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी याठिकाणी येणार आहेत. या कार्यक्रमाचे चोख नियोजन करण्यात येत आहे. राजकोट येथे उभारण्यात येणाऱ्या शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार असून मोदींच्या येण्याने मालवणचे नाव जगाच्या पटलावर जाईल, असे प्रतिपादन भाजपचे विधानपरिषद आमदार श्रीकांत भारतीय यांनी केले.

भारतीय जनता पार्टी मार्फत मालवण शहराचा पर्यटनदृष्ट्या विकास होण्यासाठी शासकीय स्तरावर मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी आज मालवणला भेट देऊन मोरयाचा धोंडा व राजकोट येथे भेट देऊन आढावा घेतला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुचनेनुसार हा दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी भाजपा डॉक्टर सेलचे महाराष्ट्र उपाध्यक्ष डॉ. अमेय देसाई, माजी आमदार राजन तेली, भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस अशोक सावंत, बाबा मोंडकर, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दिपक पाटकर, गणेश कुशे, अशोक तोडणकर, विजय केनवडेकर, महेश मांजरेकर, राजू परुळेकर, ललित चव्हाण, पंकज सादये, आबा हडकर, किल्ले सिंधुदुर्ग प्रेरणोत्सव समितीचे अध्यक्ष गुरुनाथ राणे, पर्यटन व्यावसायिक महासंघाचे मंगेश जावकर, दादा वेंगुर्लेकर, दर्शन वेंगुर्लेकर आदी व इतर उपास्थित होते.

या दौऱ्यात आमदार श्रीकांत भारतीय यांनी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांनी किल्ले सिंधुदुर्गची पायाभरणी ज्या ठिकाणी केली त्या मोरयाचा धोंडा या ठिकाणी पाहणी केली. मोरयाचा धोंडा स्थळाचा पर्यटन दृष्ट्या विकास याबाबत आम. भारतीय यांनी चर्चा केली. त्यानंतर नौदल दिना निमित्त राजकोट किल्ला येथे नौसेनेमार्फत सुरु असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व तटबंदी उभारणी कामाची पाहणी करून आढावा घेतला.

यावेळी आम. भारतीय म्हणाले, नौदल दिना निमित्त राजकोट येथे शिवरायांचा पुतळा उभारण्यात येत आहे. या नौदल दिन कार्यक्रमास भाजपचे सर्वोच्च नेते आणि जगातील लोकप्रिय नेते भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या येणार आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते शिवपुतळ्याचे अनावरण होणार आहे. राजकोट याठिकाणी पुतळा उभारणीत रायगड व शिवनेरी किल्ल्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील किल्ल्यांची माती एकत्र आणून अर्पित करण्यात आली असल्याने हि जागा श्रद्धेचे मोठे केंद्र होणार आहे. हा कार्यक्रम भव्य व प्रभावी होण्यासाठी प्रशासकीय स्तरावर अंत्यत चोख व बारकाईने नियोजन सुरु आहे. पंतप्रधान व राष्ट्रपती येत असल्याने त्यांचेही दर्शन घेण्यास लोक उत्सुक असल्याने त्यादृष्टीनेही तयारी करण्यात येत आहे, असेही आम. भारतीय म्हणाले.

तसेच पंतप्रधान मोदी याठिकाणी आल्यावर मालवण जगाच्या पटलावर जाणार आहे. त्यामुळे नौदल दिन कार्यक्रमामुळे मालवणातील पर्यटनावरही सकारात्मक परिणाम होऊन पर्यटनात अधिक वाढ होईल, असा विश्वासही आम. भारतीय यांनी व्यक्त केला.

You cannot copy content of this page