अनेक कॉजवे पाण्याखाली:वस्ती, वाड्यांचे संपर्क तुटले
वैभववाडी प्रतिनिधी
वैभववाडी तालुक्यात मुसळधार पावसाने अक्षरशः थैमान घातले आहे. मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे नदी नाल्यांनी रौद्र रूप धारण केले आहे. भुईबावडा घाणेगडवाडी सोनाळी शिंदे करुळ गावठाण ब येथील कॉजवा तर तिरवडे तर्फे खारेपाटण येथील कॉजवा अक्षरशः पाण्याखाली गेले आहेत. काही वाड्यांना पर्यायी मार्ग नसल्याने काहींचा संपर्क तुटला आहे.
तालुक्यात सलग तीन दिवसापासून धो-धो पाऊस कोसळत आहे. गुरूवारी सकाळपासून पावसाने जोरदार मुसंडी मारल्याने सर्वत्र पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वच नद्या दुथडी भरून वाहत असून नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. तर भुईबावडा घाणेगडवाडी सोनाळी शिंदेवाडी येथील कॉजवा पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. वाडीचा सर्पक तुटला आहे.
गाळ साचल्यामुळे कॉजवा पूर्णतः पाण्याखाली जातो. पावसाची तिव्रता कमी झाली की, नदीतील गाळ काढण्यात यावा अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. धुवाधार पावसामुळे बहुतांशी ठिकाणी शेतीत पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाने गुरूवारी शाळां महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे.
