अचानक निर्णयाविरोधात भारतीय मजदुर संघ आक्रमक:निषेध करीत पुन्हा सेवेत घेण्याची केली मागणी
ओरोस ता.१९-: ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड ठेकेदार कंपनीने कोणत्याही कामगार कायद्याचे पालन न करता तडका फडकी बांधकाम मंडळातील २०२१ पासून कार्यरत असलेल्या राज्यातील 300 पेक्षा जास्त कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेतून कमी केले आहे. यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश असून या कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे जिल्ह्यातील बांधकाम कामगार कार्यालय कर्मचाऱ्यांअभावी ओस पडणार आहे. कामे ठप्प होणार आहेत. त्यामुळे शासनाच्या या निर्णयाचा भारतीय मजदूर संघ सिंधुदुर्ग शाखेच्यावतीने निषेध व्यक्त करीत हा निर्णय त्वरित मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्त करण्याचे आदेश या विभागाचे सचिवानी ठेकेदार कंपनी असलेल्या ब्रिक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला दिले आहेत. त्यानुसार ठेकेदार कंपनीने या सर्व कर्मचाऱ्यांना आजपासून सेवेतून कमी केले आहे. शासनाच्या या तडका फडकी निर्णयाची माहिती मिळताच भारतीय मजदुर संघाच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाची भेट घेतली. संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांना निवेदन दिले आहे. यावेळी जिल्हा सचिव सत्यविजय जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष ओमकार गुरव, उपाध्यक्ष राजेंद्र आरेकर आदी उपस्थित होते.
