शिक्षकांसाठी हरकुळ बुद्रुक उर्दू शाळा बंद करण्याचा इशारा

ओरोस ता.१७-:

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक उर्दू शाळेतील कामगिरीवर काढण्यात आलेला शिक्षक पुन्हा शाळेत द्यावा, अशी मागणी येथील ग्रामस्थानी आज शिक्षणाधिकारी यांच्याकडे आज निवेदनाद्वारे केली आहे. १८ जुलै पर्यंत कामगिरीवर काढलेला शिक्षक पुन्हा न मिळाल्यास शाळा बंद आंदोलन करून शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हरकुळ बु. उर्दू शाळेत गेली दोन ते अडीच वर्ष पटसंख्या नुसार एक शिक्षक कमी होता. चालू शैक्षणिक वर्षात आमच्या शाळेत एक नवीन शिक्षक आल्याने पहिले ते सातवी करिता चार शिक्षक झाले होते. त्या चार शिक्षकांपैकी एका शिक्षकाची कामगिरीची ऑर्डर आपण ४ जुलै २०२३ रोजी काढली आहे. यापूर्वी या शाळेत तीन शिक्षक होते म्हणून तेथील शाळेच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. यावर्षी शाळेत चार शिक्षक झाल्यामुळे पालक समाधानी होते. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या झालेल्या नुकसानीची भरपाई होईल या आशेवर पालक होते.
त्यातच आपण आता त्यांची कामगिरी म्हणून आपण ऑर्डर काढली आहे. त्यांच्या जागेवर विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून आम्ही स्वखर्चाने शिक्षकाची नेमणूक देखील केली. परंतु कमी मानधन असल्यामुळे ते देखील शाळेत येत नाहीत. आमच्या शाळेचा पट ७० च्या वर असून जर एक शिक्षक कमी झाल्यास विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान होणार आहे. आपल्या आदेशामुळे पालकांमध्ये व ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व इतर सदस्यांनी पालकांची कशीतरी समजूत काढून त्यांना १७ जुलै संध्याकाळपर्यंत थांबण्यास सांगितले आहे. तरी आपण कामगिरीवर काढलेल्या श्री बटवाले यांना काढलेला आदेश रद्द करावा. अन्यथा पालक ग्रामस्थ शाळा बंद आंदोलन करून आपल्या कार्यालयासमोर १८ जुलै पासून आमरण उपोषणास बसतील, असा इशारा दिला आहे. दरम्यान, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष हुसेनशा परेस यांनी बोलताना चार दिवसांत शिक्षक उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले असल्याचे सांगितले.

You cannot copy content of this page