पाडलोस वनक्षेत्रात आगीचे तांडव

दोन हेक्टरवर पसरली आग : वनविभाग व ग्रामस्थांनी केले शर्थीचे प्रयत्न

⚡बांदा ता.१२-: सावंतवाडी तालुक्यातील पाडलोस-आरोस डोंगरावरील सुमारे दोन हेक्टर वनक्षेत्रात शनिवारी सकाळी अचानक आग लागली. ग्रामस्थांनी याची खबर वनविभागास दिली तोपर्यंत हळूहळू आगीने रौद्ररूप धारण केले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी पोहोचले व ग्रामस्थांच्या सहकार्याने आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे काही प्रमाणात वनसंपत्ती जळाली परंतु वनक्षेत्रालगत असलेल्या काजू व आंबा बागायती मात्र वाचविण्यात यश आले.

पाडलोस व आरोस गावातील हद्दीत असलेल्या वनविभागाच्या डोंगरात यापूर्वी दोन वेळा आग लागण्याचा प्रकार घडला. आज शनिवारी सकाळी जंगलातून धूर येत असल्याचे बागायतदार गोपाळ करमळकर यांच्या निदर्शनास आले. त्यांनी याची खबर वनविभागासह शेतकऱ्यांना दिली व सर्वांनी जंगलाच्या ठिकाणी धाव घेत आग विझवली. मात्र दुपारच्या वेळी आगीने पुन्हा पेट घेतला, त्यावेळी सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आजगाव वनपाल श्री. खोराटे, पाडलोस वनरक्षक आप्पासो राठोड, संग्राम पाटील यांनी मशीन घेत घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पाडलोस ग्रा. पं. माजी सदस्य नंदा गावडे, ग्रामस्थ गोपाळ करमळकर, दिगंबर शेर्लेकर, अनिल गावडे आदी ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. आग पुढे सरकत असल्याची परिस्थिती लक्षात घेता आप्पासो राठोड यांनी जंगलात वर्तुळाकार सफाई करत आगीवर नियंत्रण मिळविले. अंदाजे दोन हेक्टरवर आग लागल्याचे पाडलोस वनरक्षक आप्पासो राठोड यांनी सांगितले. तसेच वेळीच दखल घेतल्याने मोठ्या प्रमाणात वनसंपत्ती वाचवू शकलो असे श्री. राठोड यांनी सांगितले.
अजूनही दक्षता बाळगण्याची गरज
जंगलात चार दिवसांत दुसऱ्यांदा आग लागण्याचा प्रकार घडला आहे. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात आणण्यासाठी यश मिळाले. त्यामुळे वनविभागाने यापुढे अजूनही दक्षता बाळगण्याचे गरजेचे आहे.

You cannot copy content of this page