साहित्यिका सौ. स्नेहल फणसळकर यांचे प्रतिपादन…
मालवण दि प्रतिनिधी
मातृभाषा ही आपल्या हृदयाच्या जवळ असते, म्हणूनच मराठी ही आपली मातृभाषा आहे. आपल्या बोलण्यातून, लिहिण्यातून आणि वाचनातून मराठी भाषा वाढवली गेली आणि मराठी भाषेचे आपण जतन केले तरच मराठी भाषेला अभिजात भाषा करण्याचा मार्ग सुकर बनेल असे प्रतिपादन कुडाळ माणगांव येथील साहित्यिका सौ. स्नेहल फणसळकर यांनी येथे बोलताना केले.
मालवण येथील भंडारी ए. सो. हायस्कुल मध्ये मराठी भाषा गौरव दिन कुडाळ माणगाव येथील साहित्यिका सौ. स्नेहल माळकर – फणसळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि भंडारी एज्यु. सोसा. मालवण मुंबई या संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. त्यावेळी सौ. स्नेहल फणसळकर या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे ऑनररी जनरल सेक्रेटरी साबाजी करलकर, मुख्याध्यापक वामन खोत, सहाय्यक शिक्षिका सौ संजना सारंग, सौ. अस्मिता वाईरकर, कु. सुनंदा वराडकर, कला शिक्षक अरविंद जाधव, ग्रंथपाल प्रफुल्ल देसाई उपस्थित होते.
प्रारंभी सौ. सारंग यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले तर कु. वराडकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.
यावेळी स्नेहल फणसळकर म्हणाल्या, शाळांमध्ये मराठी भाषेविषयक जास्तीत जास्त कार्यक्रम झाले पाहिजेत. कुसुमाग्रज यांनी आपल्या काळाच्या पुढे जाऊन लिखाण केले. अनेक साहित्यिकांनी आपल्या लेखणीतून मराठी भाषा पुढे नेली. मात्र इतक्या साहित्यिकांमधून कुसुमाग्रज यांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजर होतो यातच कुसुमाग्रज यांच्या लेखणीचे सामर्थ्य दिसून येते. मराठीतील जुन्या ग्रंथाचे वाचन केले पाहिजे, त्यातून आपली संस्कृती आणि मराठीची गोडी कळते. काळानुरूप मराठी भाषा बोलताना तीचा गाभा कायम राहिला पाहिजे. आपल्या भाषेवर आपण प्रेम केले पाहिजे, आजच्या इंग्रजी भाषेकडे कल वाढत असतानाच मुलांचे प्राथमिक शिक्षण तरी मराठीमधून झाले पाहिजे. मराठीचे अस्तित्व टिकविण्यासाठी आपणच हि भाषा जपली पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
यावेळी अध्यक्ष स्थानावरून बोलताना श्री. विजय पाटकर यांनी ज्ञानपीठ पारितोषिक विजेते वि. वा. शिरवाडकर यांनी मराठी भाषेत विविधगी साहित्य निर्मिती करून मराठी भाषा समृद्ध केली. शिरवाडकर आणि मराठी साहित्यिकांचे साहित्य हे विध्यार्थ्यांनी वाचले पाहिजे आजचे युग हे स्पर्धेचे युग असल्याने या युगात वाचन केले तरच विध्यार्थी टिकू शकतो असे सांगितले. यावेळी मुख्याध्यापक वामन खोत यांनीही विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
यावेळी ग्रंथालय विभागातर्फे मोगरा या हस्तलिखिताचे प्रकाशन सौ. स्नेहल फणसळकर यांच्या हस्ते झाले. यावेळी सौ. फणसळकर यांचा संस्थेचे अध्यक्ष विजय पाटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी मराठी भाषा गौरव दिनानिमित्त घेण्यात आलेल्या हस्ताक्षर निबंध आणि वाचिका अभिनय स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ मान्यवरांच्या हस्ते पार पडला. शेवटी सौ. वाईरकर यांनी आभार मानले.
