ग्रामपंचायतीची चौकशी आणि सुनावणी घेण्याच्या पत्रानंतर माजी सरपंचाचे उपोषण 10 दिवस स्थगित

मालवण दि प्रतिनिधी

मालवण गटविकास अधिकाऱ्यांनी ५ मार्चपूर्वी प्राप्त सर्व तक्रार अर्जांवर विद्यमान ग्रामसेवक व सरपंच तारकर्ली- काळेथर ग्रा.पं.ची चौकशी व सुनावणी आपल्या दालनात घेण्याचे पत्र दिले आहे. त्यामुळे मी तहसील कार्यालयासमोरील बेमुदत उपोषण दहा दिवसांसाठी स्थगित केले आहे. अशी माहिती तारकर्लीच्या माजी सरपंच स्नेहा केरकर यांनी दिली. उपोषणाच्या इशाऱ्याने प्रशासकीय यंत्रणांना उशिरा जाग आल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

केरकर यांनी या संदर्भात सांगितले, प्रलंबित विकासकामे व अनधिकृत अतिक्रमणांविरोधात २१ फेब्रुवारी रोजी तहसीलदारांना बेमुदत उपोषणाचा इशारा दिला होता. त्यावेळी त्यांनी विविध शासकीय विभागांतील कामांची माहिती दिली होती. त्यानुसार अनेक विभागांनी आपल्या अखत्यारितील कामांबाबत केरकर यांना पत्र पाठवून माहिती दिली आहे. यात उपविभागीय अधिकारी, खारभूमी विकास, उपविभाग कणकवली, जलसंपदा विभाग, तारकर्ली बंदर, रतीलाल तारी कंपाउंड ते देवली खार बंधारा, संरक्षक बंधारा काम मंजूर केले असून ती निविदा प्रसिद्धीस दिली आहे. या कामाला लवकरात लवकर कार्यारंभ आदेश देऊन पूर्ण करण्यात येईल, असे सांगिलते आहे. तहसीलदारांनी तारकर्ली बंदरजेटी- कर्ली खाडीपात्रातील हातपाटीद्वारे वाळू उपसा १५ दिवसांच्या आत करण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. शासनाची जमीन हडप करणाऱ्या आणि त्यांना नंबर देऊन पाठराखण करणाऱ्यांचा चौकशी अहवाल आठ दिवसांत देण्याचे लेखी आश्वासन दिल्याचे त्या म्हणाल्या.

तारकर्लीवासीयांचे आभार!

सध्या सुरू असलेला फुकटचा श्रेयवाद पाहता, काही लोकप्रतिनिधींना दोन वर्षांनी आलेली जाग आहे. या सर्व राजकारण्यांचे पितळ उघडे पाडण्यासाठी मी हा उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला होता. १४ फेब्रुवारीला रांजनाला पुलावर अधिकाऱ्यांना करण्यात आलेली दमदाटी, धमकीवजा सूचना यांचा सर्वसामान्य जनतेला प्रत्यय आलेला आहे. मला माझ्या जबाबदारीतून मुक्त केल्याबद्दल तारकर्लीवासियांचे मी आभार मानते, असेही सौ. केरकर म्हणतात.

You cannot copy content of this page