केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचे आवाहन
⚡मालवण ता.२०-: सध्याच्या आधुनिक युगात मुलांचे योगदान महत्वाचे ठरणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भारत देश प्रगत राष्ट्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असताना देशात जास्तीत जास्त उद्योजक निर्माण झाले पाहिजेत. म्हणूनच विद्यार्थ्यांनी नोकरीपेक्षा उद्योजक बनण्याचे ध्येय ठेवावे, आजच्या विद्यार्थ्यांमधून अंबानी, अदानी यांच्यासारखा उद्योगपती निर्माण झाला पाहिजे असे प्रतिपादन केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी टोपीवाला हायस्कुल, मालवण येथे बोलताना केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व मंत्री व खासदार यांना त्यांच्या मतदार संघातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याच्या सूचना दिल्या असून या अंतर्गत मालवण येथील टोपीवाला हायस्कुल येथे केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांचा विद्यार्थ्यांशी संवाद कार्यक्रम आज पार पडला. यावेळी ना. राणे हे बोलत होते. यावेळी मालवण एज्यूकेशन सोसायटीचे सचिव विजय कामत यांच्या हस्ते ना. राणे यांचे पुष्पगुछ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर डॉ. मिलिंद कुलकर्णी, भाजप उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष विजय केनवडेकर, मुख्याध्यापक डी. एस. खानोलकर आदी उपस्थित होते.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ना. राणे म्हणाले, आजच्या विद्यार्थ्यांनी भविष्याची वाटचाल करताना आपल्या कुटुंबाचा खर्च भागविण्याच्या पलीकडेही उत्पन्न मिळविले पाहिजे. त्यासाठी उद्योजकतेकडे वळले पाहिजे. मुलांनी आपल्यातील आत्मविश्वास वाढविला पाहिजे. तंत्रज्ञानाचा ध्यास घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.
यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना ना. राणे यांनी उत्तरे देत मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती परीक्षेतील शिष्यवृत्तीची रक्कम वाढविणे, नववी ते बारावीच्या विद्यार्थ्यांनाही मोफत पाठ्यपुस्तके मिळावी, शिक्षक भरती, मराठी शाळा सक्षमीकरण करणे आदी प्रश्नांबाबत आपण मुख्यमंत्री तसेच शिक्षण मंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढू असे ना राणे यानी सांगितले. तसेच जिल्ह्यात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करू, चित्रकलेच्या अभ्यासासाठी जिल्ह्यात केंद्र सुरू होण्यासाठी प्रयत्न करू, जिल्ह्यात जागतिक दर्जाच्या विद्यापीठाची शाखा सुरू करण्यास प्रयत्न करू तसेच भविष्यात मालवणात मुलांना तांत्रिक अभ्यासक्रमासाठी मिनी टेक्निकलं प्रशिक्षण सेंटर निर्माण करू असे यावेळी ना. राणे यांनी सांगितले.
यावेळी कॉलेज विद्यार्थिनी गीता बनसोडे हिने नारायण राणे यांचे रेखाटलेले चित्र ना. राणे यांना भेट दिले. सूत्रसंचालन नरजहा नाईक यांनी केले तर आभार देविदास वेरलकर यांनी मानले. यावेळी माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक दीपक पाटकर, गणेश कुशे, पूजा सरकारे, बबलू राऊत, राजू बिडये यांसह टोपीवाला हायस्कुलचे शिक्षक उपस्थित होते.
