मडुऱ्यात संजू परबांनी मारला विकासकामांचा ‘षटकार’

गावातील सहा रस्त्यांचे पावसाळ्यापूर्वी होणार खडीकरण-डांबरीकरण : रक्तदान शिबिर राबविण्याचे केले आवाहन

⚡बांदा ता.१८-: मडुरा गावातील युवा वर्गाने ‘एमपीएल’साठी दाखविलेली एकी सामाजिक उपक्रम राबवताना अपेक्षित आहे. तुम्हा सर्वांची साथ असल्याने आज मी इथपर्यंत पोहोचलो. त्यामुळे मडुरा गावाच्या विकासासाठी कायम सर्वतोपरी सहकार्य राहणार. गावातील सहा रस्त्यांचे खडीकरण-डांबरीकरण पावसाळ्यापूर्वी करण्यात येणार असल्याची ग्वाही सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिली.
कै. जगन्नाथ न्हानू परब यांच्या स्मरणार्थ सावंतवाडी मराठा समाज उत्कर्ष मंडळ सावंतवाडी दोडामार्ग पुरस्कृत मडुरा प्रीमियर लीगच्या उद्घाटन समयी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. परब बोलत होते. यावेळी व्यासपीठावर रोणापाल माजी सरपंच सुरेश गावडे, शेर्ले माजी सरपंच उदय धुरी, मडुरा उपसरपंच बाळू गावडे, भाजपा शक्ती केंद्र प्रमुख यशवंत माधव, सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ परब, दिनेश नाईक, पत्रकार विश्वनाथ नाईक तसेच सर्व संघांचे मालक आदी मान्यवर उपस्थित होते.
संजू परब म्हणाले की, सद्यस्थितीत जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे. त्यामुळे आपल्या मडुरा गावात एखादे रक्तदान शिबिर व्हावे, त्यासाठी लागणारे सर्वतोपरी सहकार्य आपण करणार. गावातील युवा वर्गाने यासाठी पुढे यावे असे आवाहन यावेळी श्री. परब यांनी केले.

सुरेश गावडे म्हणाले की, मडुरा गावात दहा वर्षे सुरू सुरू असलेली एमपीएल स्पर्धा कौतुकास्पद आहे. जसे खेळण्यासाठी एकत्र येतात तसेच सर्वांगीण विकासासाठी एकत्र या व उपक्रम राबवा, आम्ही तुम्हाला पाठबळ देऊ असे श्री.गावडे म्हणाले. शेर्ले माजी सरपंच उदय धुरी म्हणाले की, मडुरा गावातील एमपीएल क्रिकेट मंडळाचा सर्वांनी आदर्श घ्यावा. नियोजन व शिस्तबद्ध खेळ एमपीएल मधून दिसून येतो. जय-पराजय यापेक्षा सर्व एकत्र येतात हे गावाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याचे श्री धुरी म्हणाले.
मडुरा उपसरपंच बाळू गावडे म्हणाले की, आजपर्यंत संजू परब यांच्या माध्यमातून मडुरा गावातील अनेक समस्या मार्गी लावल्या. त्यामुळे भविष्यात संजू परब यांना आपली आवश्यकता भासेल त्यावेळी सहकार्य करणार असल्याचे ग्वाही बाळू गावडे यांनी दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक तुषार धुरी यांनी केले. स्वागत प्रवीण परब यांच्यासह मंडळातील कार्यकर्त्यांनी तर आभार बाळू गावडे यांनी मानले.

You cannot copy content of this page