बांदा कट्टा कॉर्नर येथील उड्डाणपुलाची रखडलेली बमोजनी प्रक्रिया २७ रोजी

यापूर्वीची प्रक्रिया आली होती रोखण्यात

बांदा/सकाळ वृत्तसेवा
बांदा कट्टा कॉर्नर येथील प्रस्तावित असलेल्या राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या ६०० मिटर लांबीच्या उड्डाणपूलासाठी २७ व २८ रोजी अंतिम संपादित करण्यात येणाऱ्या जागेची अंतिम मोजणी प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी सीमांकन चुकीचे असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी काम बंद पाडले होते. त्यावेळी भूमी अभिलेख कार्यालयच्या नकाशाप्रमाणे मोजणी करण्याची मागणी करण्यात आली होती.
मोजणीसाठी महामार्गाच्या लगत अतिक्रमण केलेल्या दुकानधारक व गाळेधारकांना नोटीसा बजाविण्यात आल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी कामाचा मक्ता घेतलेल्या ठेकेदार कंपनीने जागेची मोजणी केली होती. मात्र ही मोजणी अमान्य असल्याचे कारण देत स्थानिकांनी काम बंद केले होते. तसेच महामार्ग विभागाचे उपअभियंता महेश खटी यांना घेरावो घालत जाब विचारला होता.
त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग विभागाने शासकीय मोजणी करून जागा निश्चित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याप्रमाणे रितसर प्रस्ताव सावंतवाडी उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्या कार्यालयाकडे सादर केला आहे. त्या अनुषंगाने प्रस्तावित उड्डाणपुलाच्या संपादित जागेची शासकीय मोजणी दिनांक २७ व २८ तारखेला होणार आहे व मोजणीची प्रक्रिया पार पडल्यानंतर चार दिवसात अतिक्रमण हटविण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून हाती घेतले जाणार आहे. असे राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उप अभियंता महेश खटी यांनी सांगितले आहे. नोटीसा बजाविलेल्या गाळेधारकांनी मोजणीच्या वेळी प्रत्यक्ष जागेवर उपस्थित राहावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page