⚡मालवण ता.१७-: मसुरे डांगमोडे मार्गाची तड येथील सड्यावर आकारी ब्राह्मण देवस्थान जवळ गतवर्षी सापडलेल्या शिवलिंगाच्या ठिकाणी उद्या दि. १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीचे औचित्य साधून धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मसुरे डांगमोडे मार्गाची तड येथील सड्यावर आकारी ब्राह्मण देवस्थानच्या ठिकाणी एका वटवृक्षाखाली गतवर्षीच्या महाशिवरात्रीच्या उत्सवावेळी मिश्र धातूची शिव पिंडी आढळून आली होती. आकारी ब्राह्मण देवस्थानच्या ठिकाणी जाईन ब्राह्मण, गाय गोठण आणि खराडो ब्राह्मण अशीही देवस्थाने आहेत. दरवर्षी रितिरिवाजानुसार याठिकाणी देवस्थानचे मानकरी आणि ग्रामस्थ ब्राह्मण भोजन करतात. हे देवस्थान मसुरे डांगमोडे येथील जागृत देवस्थान श्री देव रवळनाथ यांच्याशी निगडित आहे. गतवर्षी महाशिवरात्रीच्या दरम्याने सापडलेल्या या शिवलिंगाची ख्याती सर्वत्र पसरल्यानंतर या प्राचीन शिवलिंगाच्या दर्शनासाठी ग्रामस्थांसह इतरही भाविक दर्शनासाठी श्रद्धेने ये जा करतात.
एक जागृत देवस्थान म्हणून या देवस्थानचा उल्लेख केला जातो. उद्या दि. १८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजल्यापासून या शिवलिंगाच्या ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी दुग्धभिषेक, लघुरुद्र, अभिषेक आदी कार्यक्रम झाल्यानंतर दुपारी १ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन समस्त ठाकूर मंडळींनी केले आहे.
