⚡मालवण ता.१४-:
मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयात दि.१६ व १७ फेब्रुवारी रोजी महाविद्यालय भूगोल विभाग, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष व कोकण जिओग्राफर असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने पर्यटनातील नवप्रवाह अर्थात ‘रिसेंट ट्रेंड्स इन टुरिझम’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.
या चर्चासत्रात डॉ. डी. के. कांबळे सह सल्लागार नॅक बेंगलोर तसेच मालवण तहसीलदार श्रीधर पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. कृ. सी. देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीपाद पंतवालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली या कॉन्फरन्सच्या उद्घाटनाचा सोहळा १६ फेब्रुवारी सकाळी दहा वाजता स. का. पाटील महाविद्यालय नरहरी प्रभू झांट्ये सभागृहात होणार आहे.
कॉन्फरन्स साठी कृ. सी. देसाई शिक्षण मंडळ मालवणचे सचिव चंद्रशेखर कुशे, कॉलेज डेव्हलपमेंट कमिटीचे चेअरमन अँड. समीर गव्हाणकर, डॉ. दिलीप भारमल, प्राचार्य, पंचम खेमराज सावंतवाडी कॉलेज यांची विशेष उपस्थिती असेल. तसेच या कॉन्फरन्ससाठी डॉ. सनलकुमार केरळ, डॉ. समीर बुटाला पोलादपूर, डॉ. दिपाली गडकरी मुंबई, डॉ. हेमंत पेडणेकर मुंबई, डॉ. एस. बी. गायकवाड मिरज, डॉ. नंदकुमार सावंत गोवा, डॉ. दीपक कोल्हापुरे कर्नाटक, डॉ. सुशील दलाल हरियाणा यांच्यासह भारतातून एकूण नऊ विविध राज्यातून जवळपास १२५ भूगोल तसेच आंतर विद्याशाखांचे अभ्यासक आणि संशोधक उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवराम ठाकूर व कोकण जिओग्राफर्स असोसिएशन ऑफ इंडियाचे सेक्रेटरी डॉ. आर. बी. पाटील यांनी दिली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून सखोल चर्चा, पर्यटनातील भविष्यकालीन नियोजनाचा उहापोह अशा विविध अंगांशी निगडित असलेल्या वेगवेगळ्या विषयावर या कॉन्फरन्सच्या माध्यमातून तज्ञ आणि संशोधक मंडळींमध्ये सखोल चर्चा व विचारविनिमय करण्यात येणार आहे. तरी मालवण आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन अभ्यासक, तज्ञ, नवीन संकल्पना राबवू इच्छिणारे पर्यटन व्यावसायिक इत्यादींनी या चर्चासत्रात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
