बांदा शहरात भव्य वाहन फेरी

८ रोजीच्या हिंदू जनजागृती सभेनिमित हिंदूंनी काढली रॅली

बांदा/प्रतिनिधी
बांदा येथे रविवार दिनांक ८ रोजी होणाऱ्या हिंदू राष्ट्र जागृती सभेच्या जनजागृतीसाठी आज बांदा शहरात हिंदू बांधव व भगिनींनी भव्य वाहन फेरी काढली. या फेरीत शेकडो बांधव दुचाकीवरून सहभागी झाले होते.
आज सकाळी श्री बांदेश्वर मंदिर येथे प्रभू श्रीराम यांच्या प्रतिमेचे व ध्वजाचे पूजन करण्यात आले. त्यानंतर वाहन फेरीला सुरुवात करण्यात आली. यावेळी जय भवानी, जय शिवाजी, हिंदू धर्माचा विजय असो अशा घोषणांचा जयघोष करण्यात आला. शहरातील जुनी व्यायामशाळा, संत सोहिरोबानाथ आंबीये मठ, उभाबाजार, मोर्येवाडा, श्री विठ्ठल मंदिर, नट वाचनालय, कट्टा कॉर्नर, गडगेवाडी, निमजगा, गवळीटेम्ब, वाफोली मार्गे एसटी बसस्थानक, राजगुरू संकुल येथे येत फेरीची सांगता करण्यात आली. याठिकाणी हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक हेमंत मणेरीकर, गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव जयेश थळी यांनी मार्गदर्शन केले. हिंदू धर्माच्या भविष्यासाठी रविवारी होणाऱ्या सभेसाठी मोठ्या संख्येने हिंदू बांधवानी हजर राहावे असे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी बांदा शहर, परिसरातील तसेच गोव्यातील हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती.
चौकट :-
वाहन फेरीच्या सांगता सोहळ्यावेळी गोव्यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणारे केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी बांदा येथे थांबून सभेसाठी आपल्या शुभेच्छा दिल्यात. यावेळी गुरुनाथ सावंत व हिंदू जनजागृती पदाधिकाऱ्यांनी मंत्री राणे यांना सभेची सविस्तर माहिती दिली.

You cannot copy content of this page