महाविकास आघाडी विरुद्ध भाजप शिंदे गट होतेय निवडणूक;संजना सावंत विरुद्ध अर्चना सावंत रंगतोय सामना
⚡सावंतवाडी ता.०८ प्रसन्न गोंदावळे-: तालुक्यातील राजकीय लक्ष लागून राहिलेल्या माजगाव ग्राम पंचायतची रणधुमाळी रंगत आली आहे. येथे महाविकास आघाडी विरुद्ध भाजप – शिंदे गट असे दोन पॅनेल आमने सामने ठाकले आहे. महाविकास आघाडी कडून संजना सावंत तर भाजप शिंदे गटाकडून अर्चना सावंत सरपंच पदासाठी निवडणूक रिंगणात उतरलेल्या आहेत. सरपंच पदाचे दोन्ही विरोधी उमेदवार सावंत असल्याने ही निवडणूक अधिकच रंजक बनत आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने विक्रांत सावंत तर भाजप शिंदे गटाकडून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष रेश्मा सावंत व मनोज नाईक यांच्याकडे या निवडणुकीची धुरा असल्याने कोणाची व्यूहरचना यशस्वी होते ? हे २० डिसेंबर रोजी स्पष्ट होणार आहे. त्यामुळे याकडे सर्व राजकीय पक्षांचे लक्ष लागले आहे.
