गुळदुवे ग्रामस्थांची बांधकाम विभागाकडे निवेदनाद्वारे मागणी*
⚡सावंतवाडी ता.२२सहदेव राऊळ-: मळेवाड-गुळदूवे ते आरोंदा मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला सध्या मोठ्या प्रमाणात झाडी वाढली असून या झाडीमुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे रस्त्याच्या बाजूने वाढलेली ही झाडी बांधकाम विभागाने लवकरात लवकर तोडावी, अशी मागणी गुळदुवे ग्रामस्थांच्यावतीने बांधकाम विभागाला निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी अधिकारी सीमा गोवेकर, शैलेंद्र जोशी, देवेंद्र शेटकर, पत्रकार निलेश परब, शांताराम रेडकर आदी उपस्थित होते.
निवेदनात म्हटले की, काही दिवसांपूर्वी गुळदुवे येथील ग्रामपंचायत सदस्य देवेंद्र शेटकर हे मळेवाड वरुन आपले काम आटोपून घरी जात असताना रात्री पावणे नऊच्या सुमारास या झाडीत लपून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. मात्र शेटकर हे सुदैवाने थोडक्यात बचावले. मात्र त्यांचा थरकाप उडाला. तसेच गुळदुवे येथील ग्रामस्थांच्या पाळीव कुत्र्यावर या बिबट्याने हल्ला केला होता. सध्याही बिबट्या ग्रामस्थांच्या दृष्टीत पडत असून, ग्रामस्थांत भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यात करून या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना झाडी वाढलेली आहे त्यामुळे हे जंगली प्राणी या झाडीचा आसरा घेऊन अचानक येणाऱ्या जाणाऱ्या ग्रामस्थ, पादचारी, वाहनधारकांवर हल्ला करण्याची दाट शक्यता आहे. तसेच वाहनधारकांना वाहने चालविताना सुद्धा या झाडीमुळे त्रास होत आहे. त्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असल्यामुळे बांधकाम विभागाने ही झाडी तोडावी असे निवेदनात म्हटले आहे.
