श्रावण नंबर १ शाळेत व्यावसायिक कौशल्य विकसनातून गणित अध्यापन

पदवीधर शिक्षिका साक्षी कुबल यांचा नावीन्यपूर्ण उपक्रम

ओरोस ता.१६-:

मालवण तालुक्यातील महात्मा गांधी विद्यालय श्रावण १ येथे ‘व्यावसायिक कौशल्य विकसनातून गणित अध्यापन’ या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कोरोना कालावधीमध्ये शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली शिक्षणाविषयी उदासीनता दूर करून गणित सारखा क्लिष्ट विषय सहज सोप्या पद्धतीने शिकवून विद्यार्थ्यांमध्ये अभिरुची निर्माण व्हावी या उद्देशाने श्रावण नंबर १ च्या पदवीधर शिक्षिका श्रीमती साक्षी कुबल यांनी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन केले होते.
या उपक्रमा अंतर्गत विद्यार्थ्यांच्या अंगी उदबत्ती बनविणे, फुलांचे हार व वेण्या बनवून त्यांची स्थानिक परिसरात विक्री करणे, केरसुण्या बनविणे आदी कार्यशाळांचे आयोजन करत त्या अनुषंगाने गणिती क्रिया, एकमान पद्धत, गुणोत्तर व प्रमाण, शेकडेवारी, नफा-तोटा, आलेख इत्यादी पाठ्यपुस्तकातील घटकांचे कृतिशील अध्यापन करून विद्यार्थ्यांना झालेला नफा प्रत्यक्ष बँकेमध्ये नेऊन चलन भरणे, बँक व्यवहार इत्यादींची माहिती करून दिली.
या नवोपक्रमाचा विद्यार्थ्यांवर सकारात्मक परिणाम दिसून आला असून गणित विषयाबाबत आनंददायी वातावरण निर्माण करण्यात यश आले आहे. त्या बरोबरच व्यवसायिक कौशल्यबाबत सकारात्मक विचार रुजल्याचे जाणवते. उपक्रमासाठी स्थानिक कारागीर, मुख्याध्यापक, सहकारी शिक्षक यांची मोलाची साथ लाभली.

You cannot copy content of this page