⚡मालवण ता.०३-: मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाच्या होणाऱ्या निवडणुकीत भाजपा पुरस्कृत श्री देव रामेश्वर नारायण सातेरी सहकार विकास पॅनलचा विजय आजच निश्चित झाला आहे. कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणारे स्व. सुनील मलये यांचे सहकारी व आमचे सर्व सहकारी एकत्रितपणे भाजप पुरस्कृत पॅनलमधून ही निवडणूक लढवत असून हे पॅनल १०० टक्के विजयी होईल, असा विश्वास भाजपचे प्रदेश सचिव, माजी खासदार निलेश राणे यांनी मालवण येथे पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केला.
मालवण तालुका सहकारी खरेदी विक्री संघाची १३ नोव्हेंबर रोजी निवडणूक होत असून निवडणुकीसाठी आज गुरुवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. या पार्श्वभूमीवर मालवण दौऱ्यावर असलेल्या माजी खासदार निलेश राणे यांची भाजपा पुरस्कृत उमेदवारांनी निलरत्न निवासस्थानी भेट घेतली. यावेळी निलेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी भाजपा पुरस्कृत पॅनलचे उमेदवार संस्था मतदार संघ कृष्णा चव्हाण, राजन गावकर, महेश मांजरेकर, प्रफुल्ल प्रभू, अभय प्रभुदेसाई, राजेंद्र प्रभुदेसाई. व्यक्ती मतदार संघ : विजय ढोलम, महेश गावकर, गोविंद गावडे, रमेश हडकर. अनुसूचित जाती जमाती : सुरेश चौकेकर. इतर मागास वर्ग : कृष्णा ढोलम. भटक्या विमुक्त जाती जमाती : अशोक तोडणकर. महिला जागा : सरोज परब, अमृता सावंत. यासह माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, जिल्हा बँक संचालक बाबा परब, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, दादा नाईक, संतोष गावकर, रवी मालवणकर, राऊत, प्रमोद करलकर, पूजा करलकर, मनवा गावकर, मनाली चव्हाण, संतोष चव्हाण, यशवंत पराडकर, आबा ढोलम, भावेश चव्हाण, भाग्येश चव्हाण यासह अन्य उपस्थित होते.
यावेळी निलेश राणे म्हणाले, मालवण तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत भाजप आपल्या पॅनलच्या माध्यमातून निवडणुकीत उतरले आहे. या निवडणुकीसाठी भाजपने योग्य उमेदवार मैदानात उतरवले असून या सर्व १५ उमेदवारांचा विजय निश्चित आहे. राज्यात भाजपचे सरकार असून खरेदी विक्री संघाचे प्रश्न, कामगारांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी आम्ही पेलू शकतो, पारदर्शक कारभार देऊ शकतो, गेल्या सात वर्षात ज्याप्रकारे संघावर एकहाती सत्ता राहिली तसेच येणाऱ्या पाच वर्षातही संघावर आमचीच सत्ता राहील. या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनल विरुद्ध महाविकास आघाडी पुरस्कृत अशी लढाई असली तरी आमची कोणाशीच स्पर्धा राहिली नसून ही निवडणूक आम्ही जिंकल्यासारखेच आहे, असा विश्वास यावेळी निलेश राणे यांनी व्यक्त केला.
मालवण तालुका सहकार क्षेत्रात कार्यरत असणारे व कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढा देणारे सुनील मलये यांचे काही दिवसांपूर्वीच अपघाती निधन झाले. त्यांच्या सोबत काम केलेली अनेक लोक आज या भाजप पुरस्कृत पॅनलच्या माध्यमातून एकत्र आली आहेत. मलये यांचे सहकारी व आमची माणसे एकत्र येऊन सहकारात काही करू शकतो या विचारानेच भाजप पुरस्कृत पॅनल निर्माण केले आहे. त्यामुळे १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत पॅनलचा विजय हा निश्चितच आहे. हा विजय म्हणजेच स्व. सुनील मलये यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल, असेही निलेश राणे यावेळी म्हणाले.
