तर जुने शिवसैनिक रस्त्यावर उतरतील;जेष्ठ शिवसैनिक माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांचा इशारा
मालवण (प्रतिनिधी)
शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आणि स्वतःला निष्ठावंत म्हणणाऱ्या एकनाथ शिंदे व आमदारांना शिवसेनेचा इतिहास तरी माहीत आहे का ? शिवसेना या चार शब्दांचा अर्थ या आमदारांनी सांगावा. आम. दीपक केसरकर, उदय सामंत यांचे शिवसेनेतील वय किती ? बाहेरून शिवसेनेत आलेल्यानी आणि विकले गेलेल्यानी आम्हाला निष्ठा शिकवू नये, अशी टीका शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी पत्रकार परिषदेत करत शिवसेना ही ज्येष्ठ शिवसैनिकांनी उभी केलेली संघटना आहे, शिवसेनेशी दगा फटका करण्याचा प्रयत्न केल्यास ज्येष्ठ शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील असा इशारा बंडखोर आमदारांना दिला आहे.
मालवण शिवसेना शाखा येथे ज्येष्ठ शिवसैनिक भाई गोवेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन बंडखोर आमदारांवर टीका केली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, माजी नगरसेवक मंदार केणी, आदी व इतर उपस्थित होते.
यावेळी भाई गोवेकर म्हणाले, आपण वयाच्या १८ व्या वर्षापासून शिवसेनेत काम करण्यास सुरुवात केली. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत. पदाची अपेक्षा न ठेवता पक्षासाठी काम केले. शिवसेना उभी करण्यात ज्येष्ठ शिवसैनिकांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे आमच्यानंतर पक्षात येऊन आता बंडखोरी करणाऱ्या आमदारांनी पक्षनिष्ठेच्या गोष्टी शिकवू नयेत. बंडखोरांनी बाळासाहेबांचे नाव घेऊन स्वतःचा प्रचार करून जनतेत गैरसमज निर्माण करू नये. तुम्ही बाळासाहेबांचे खरे शिवसैनिक असता तर “आपल्यानंतर उद्धव व आदित्यला सांभाळा” हा बाळासाहेबांचा आदेश पाळला असता असे भाई गोवेकर म्हणाले
जे दुसऱ्या पक्षातून शिवसेनेत आले, जे बाळासाहेबांच्या निधनानंतर शिवसेनेत आले, ज्यांचा शिवसेनेच्या विचारधारणेशी संबंध नाही ते आज बोलत आहेत. त्यांना शिवसेनेचा इतिहास माहीत आहे का ? उदय सामंत, दीपक केसरकर अशा बाहेरून आलेल्याना उमेदवारी दिली हीच शिवसेनेची चूक झाली. ज्यांना पदे दिली त्यांनीच गद्दारी केली आहे. बंडखोर हे स्वार्थासाठी दुसरीकडे गेले असून लवकरच त्यांना त्यांची जागा कळेल. जिल्ह्यात शिवसेना संकटात असताना आम. वैभव नाईक यांनीच शिवसेना पुन्हा उभी केली. त्यामुळे पुढील निवडणुकीत नाईक यांच्या विरोधात उभे राहणाऱ्यांचे डिपॉझिट आम्ही जप्त करून दाखवू, असा इशाराही भाई गोवेकर यांनी यावेळी दिला.
