⚡मालवण ता.१६-: वायरी भूतनाथ शाळा नं. १ च्या मुख्याध्यापिका सौ. शुभदा पुजारे या प्रशालेत १६ वर्षांची सेवा बजावून सेवानिवृत्त झाल्याने माजी विद्यार्थी संघटनेतर्फे त्यांचा निवृत्तीपर सत्कार करण्यात आला. आजपर्यंत सर्व ग्रामस्थ, सहकारी शिक्षक, पालक यांच्या सहकार्यामुळेच आपण उत्तम सेवा बजावू शकलो, अशा भावना सौ. पुजारे यांनी यावेळी व्यक्त केल्या.
या सत्कार कार्यक्रमाच्या प्रारंभी भाऊ तळवडेकर यांनी सर्वांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष रवींद्र वराडकर यांच्या हस्ते सौ. शुभदा पुजारे यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नूतन मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा देऊलकर, राजेंद्र परब, सौ. केतकी पाडगावकर, मनीषा निकम या शिक्षकांसह नंदू झाड, उदय पाटकर, प्रकाश पेंडूरकर, प्रदीप वेंगुर्लेकर, दीपक देऊलकर, मंदाकिनी लोके, रसिका माडये, सिद्धार्थ पुजारे आदी उपस्थित होते.
यावेळी रवींद्र वराडकर यांनी वायरी भूतनाथ शाळेचा शतकोत्सव हा सौ. पुजारे यांच्या मुख्याध्यापक पदाच्या कारकिर्दीत साजरा झाला हे त्यांचे भाग्य आहे, अनेक विद्यार्थी घडवत पुजारे यांनी शैक्षणिक सेवेत केलेले कार्य आदर्शवत आहे, असे सांगत सौ. पुजारे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी भाऊ तळवडेकर, राजेंद्र परब, प्रदीप देऊलकर, रसिका माडये, उदय पाटकर, नंदू झाड यांनीही सौ. पुजारे यांच्या बद्दल आपल्या भावना व्यक्त करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. आभार राजेंद्र परब यांनी मानले.
