*⚡ओरोस ता १२-: सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचा कोविड स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्याच्या प्रशासन प्रमुख असणाऱ्या जिल्हाधिकारी कोविड पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. मात्र त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी यांनी रॅपिड अँटिजेन टेस्ट केली होती. यामध्ये त्यांचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आर टी पीसीआर चाचणीकरिता जिल्हाधिकाऱ्यांनी चाचणी दिली आहे. त्याचा रिपोर्ट अद्याप यायचा बाकी आहे.
१० जानेवारी रोजी जिल्हा नियोजन सभा झाली. यावेळी पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह जिल्ह्याचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच जिल्हा नियोजन सभेनिमित्त जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांनी अनेक आढावा बैठका घेतल्या आहेत. त्यामुळे संपर्कात आलेल्या अधिकारी-कर्मचारी तसेच नागरिक, राजकीय व्यक्ती यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेची सुद्धा डोकेदुखी वाढणार आहे. जिल्हाधिकारी यांच्या संपर्कात नजीकच्या काळात आलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेसमोर राहणार आहे.
