तहसीलदार सचिन पाटील यांची माहिती..
⚡कुडाळ ता.०६-: कुडाळ तहसील कार्यालय यांच्या अवंतीने ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१) अंतर्गत कुडाळ नगरपंचायत व कुडाळ महसूली मंडळ स्तरावर शुक्रवार दि. ८ मे २०२६ रोजी सकाळी ठिक १० वाजता तहसिलदार कार्यालय, कुडाळ येथे महसूल शिबिराचे आयोजन केले आहे. अशी माहिती तहसिलदार सचिन पाटील यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
तहसीलदार सचिन पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक मराअ-2026/प्र.क्र.01/समन्वय-1 दिनांक 18/02/2026 अन्वये तहसील कार्यालय, कुडाळमार्फत ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान (टप्पा-१)” अंतर्गत कुडाळ नगरपंचायत व कुडाळ महसूली मंडळ स्तरावर दि .08/05/2026 रोजी सकाळी ठिक 10.00 वाजता तहसिलदार कार्यालय, कुडाळ येथे महसूल शिबिराचे आयोजन केले आहे. कुडाळ तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, शेतमजूर, विद्यार्थी व महिलांसाठी महसूल विभागातील महत्वाच्या १५ सेवांचा लाभ एकाच दिवशी देण्यासाठी हे विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
या शिबिरांमध्ये प्रलंबित फेरफार, ७/१२ मधील चुकीची दुरुस्ती, डिजिटल स्वाक्षरीचे ७/१२व ८-अ उताऱ्यांचे वाटप, उत्पन्न, रहिवासी व जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, अकृषिक (NA) परवानगी, अकृषिक तरतुदीबाबत मार्गदर्शन व सुधारणा, ‘सनद” प्रक्रियेची माहिती, सामाजिक अर्थसहाय्य योजनांचे (संजय गांधी योजना) लाभ मंजूर करणे, विद्यार्थ्यासाठी दाखले वाटप, तुकडेबंदी कायदा उल्लंघन प्रकरणांचा निपटारा, घरांसाठी पटटे वाटप व ई- मोजणी अर्ज, Agristack शेतकरी नोंदणी, पीएम किसान नोंदणी, वर्ग 2 चे वर्ग 1 करणेबाबतची प्रकरणे, आयुष्यमान भारत कार्ड, रेशनकार्ड वरील नाव कमी-जास्त करणे तसेच भूसंपादन व अकृषिक परवानगी प्रकरणी ‘कमी-जास्त पत्रके’ तयार करून गाव दप्तर अद्यावत करण्याची कामे करण्यात येणार आहेत. याचबरोबर संबंधित सेवा विषयक अर्जही स्विकारण्यात येणार आहेत, असे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
कुडाळ तालुक्यातील कुडाळ मंडळातर्गत गावातील नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी सदर दिवशी आयोजित केलेल्या शिबिरात आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहून महसूल विभागाच्या सेवांचा लाभघ्यावा असे आवाहन तहसिलदार सचिन पाटील यांनी केले आहे.
