संदीप जोशी यांच्या सादरीकरणाने रसिक मंत्रमुग्ध:आरती प्रभू कला अकादमी आणि स्वरझंकार यांचे आयोजन..
कुडाळ : आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ आणि स्वरझंकार, डोंबिवली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या पंचम संगीत या रसास्वाद कार्यशाळेने दिग्गज संगीतकार आर डी बर्मन यांच्या चित्रपट संगीताचे सौंदर्य विशेष उलगडून दाखवले आणि उपस्थित आरडीप्रेमी दोन तास त्या संगीतमय जगतात हरवून गेला. स्वरझंकार, डोंबिवली या संस्थेचे संदीप जोशी यांनी उपस्थित रसिकांसमोर पंचमदांचा हा संगीतमय प्रवास आपल्या अनोख्या शैलीत सादर केला.
कुडाळच्या चिं त्र्यं खानोलकर ललित कला केंद्रामध्ये या पंचम संगीत रसास्वाद कार्यशाळेचे अर्थात संगीत रसिकांसोबतच्या एका मुक्त संवाद सत्राचे आयोजन करण्यात आले होते. डोंबिवलीच्या स्वरझंकार संस्थेचे संदीप जोशी यांनी हा कार्यक्रम सादर केला. कार्यक्रमाचा शुभारंभ संदीप जोशी आणि आरती प्रभू कला अकादमीचे सदस्य रंगकर्मी प्रफुल्ल वालावलकर यांच्या हस्ते नटराज पूजन करून झाला. आरती प्रभू कला अकादमीचे कार्यवाह केदार सामंत यांनी संदीप जोशी आणि प्रफुल्ल वालावलकर यांचे स्वागत केले.
त्यांनतर सर्व कार्यक्रमाची सूत्र संदीप जोशी यांनी आपल्या हातात घेऊन संगीतकार आर डी बर्मन तथा पंचमदा यांच्या सांगीतिक कारकिर्दीचा मागोवा घेतला. त्यांनी संगीतबद्ध केलेली गाणी. त्या गाण्यांमध्ये झालेला विविध वाद्यांचा वापर. त्या मागची एखादी कहाणी, किस्सा यांची सुंदररीतीने पखरण करत, प्रसंगी ती गाणी ऐकवत संदीप जोशी यांनी पंचमदांचा हा प्रवास रसिकांसमोर उभा केला. काही गाणी रसिकांच्या चांगल्या परिचयाची होती पण त्या मागचा पंचमदांचा नेमका हेतू, नेमकी तीच वाद्य का वाजवली वगैरे गोष्टींचे विवेचन संदीप जोशी यांनी ओघवत्या शैलीत सादर केले. त्यामुळे रसिक आपसूकच आर डी बर्मन यांच्या त्या काळात फिरून आले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती प्रभू कला अकादमीचे सदस्य निलेश उर्फ बंड्या जोशी यांनी केले. यावेळी आरती प्रभू कला अकादमीचे अध्यक्ष आनंद वैद्य, कमशिप्र मंडळाचे सुरेश चव्हाण, आरती प्रभू कला अकादमीचे सदस्य डॉ. जी एस कुलकर्णी, बाबा वर्दम थिएटर्सचे विवेक देसाई, सचिन कोंडस्कर, हेमंत देशपांडे, जनार्दन डोर्लेकर, डॉ. संजय सावंत, भूषण जडये, सौ. आर्या जडये आणि आरडी प्रेमी संगीत रसिक उपस्थित होते.
